टीम इंडिया २३ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी सुर्यकुमार यादवला कॅप्टन बनवण्यात आले आहे. तर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला पुन्हा एकदा टीम इंडियातून डच्चू देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सुर्यकुमार यादव हा क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये सपशेल अपयशी ठरला होता. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवडकर्त्यांनी सूर्यकुमार यादवला पदोन्नती देऊन नवीन जबाबदारी दिली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी बोर्डाने भारतीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेला २३ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथून सुरुवात होणार आहे.
यादरम्यान सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर आहे, तर रोहित शर्मासह अनेक सीनियर्स या मालिकेचा भाग नाहीत.
विश्वचषकात केवळ १०६ धावा करणाऱ्या सूर्याला एक्स फॅक्टर म्हटले जाते. परंतु तो अद्याप त्या पातळीवर कामगिरी करू शकला नाही. क्रिकेट वर्ल्डकपनंतर त्याची एकदिवसीय कारकीर्दही धोक्यात आल्याचे मानले जात आहे.
पण, आता टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद मिळाल्याने त्याच्याकडून चमत्कारिक कामगिरीची आशा आहे. दुसरीकडे, पांड्याला ६ ते ८ आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरूमधील शेवटच्या दोन T20 सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल, तर ऋतुराज गायकवाड पहिल्या ३ सामन्यांमध्ये उपकर्णधार असेल.
दरम्यान, सुर्यकुमार यादव आता या प्रमोशनचा फायदा घेत आपली कामगिरी पुढे चालू ठेवू शकतो की नाही हे पाहायचे आहे. कारण इथून परिस्थिती बदलेल. भारताला पुढील वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये विश्वचषक खेळायचा आहे आणि त्यासाठीची तयारी आतापासून सुरू करावी लागेल.
भारताने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सहभागी झालेल्या आपल्या बहुतेक खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. मात्र, ५० षटकांचा विश्वचषक संपल्यानंतर भारताने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा तंदुरुस्त झालेल्या बुमराहने या वर्षाच्या सुरुवातीला आयर्लंड मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही दुखापतीमुळे वनडे विश्वचषकाला मुकल्यानंतर संघात परतला आहे.
तर इशान किशन आणि जितेश शर्मा यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे, तर सुपरस्टार संजू सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून डच्चू मिळाला आहे. संजूला निवड समितीने पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे.