IND Vs AUS T20 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता भारताविरुद्ध टी-20 मालिकेत खेळणार आहे. ५ सामन्यांची ही मालिका २३ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे.
विशाखापट्टणम येथे होणाऱ्या सलामीच्या लढतीपूर्वी कांगारू संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे.
वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने संघासाठी ११ सामन्यात सर्वाधिक ५३५ धावा केल्या होत्या. ३५ वर्षीय ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड भारताविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करेल.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय वॉर्नर या मालिकेत न खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्याशिवाय विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क हेही भारताविरुद्धची टी-20 मालिका खेळणार नाहीत. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर कांगारू संघाला १४ डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
वॉर्नरने आपले नाव मागे घेतल्यानंतर अष्टपैलू अॅरॉन हार्डीचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. तर केन रिचर्डसन हा या टी-20 मालिकेत स्पेन्सर जॉन्सनची जागा घेणार आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर अवघ्या ४ दिवसांनी ही मालिका सुरू होणार आहे. पण ही मालिका पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये होणाऱ्या T20 वर्ल्डकपच्या तयारीचा एक भाग आहे.
पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-20 वर्ल्डकप होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणखी ६ टी-20 मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, तन्वीर संघा.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.