टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये आज सोमवारी (२४ जून) भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. सुपर ८ फेरीचा हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरूवात होईल.
या विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. भारत आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल तर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव करून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्याची इच्छा आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यानंतर कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आणि कोणाला आणखी संघर्ष करावा लागणार याबाबत बरेच काही स्पष्ट होणार आहे. अशा स्थितीत हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा असून चाहत्यांना हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळणार आहे.
तत्पूर्वी रविवारी अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीचा दावा ठोकला. आता त्यांना बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. जर त्यांनी हा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर त्यांचा नेट रनरेट सुधारेल आणि त्यांच्या खात्यात ४ गुण होतील. दुसरीकडे, भारताला ऑस्ट्रेलियाला कोणत्याही किंमतीत पराभूत करावे लागेल. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशा बळकट होतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १९ सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने ११ सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर भारताने ३ सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने केवळ २ सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. अशा स्थितीत भारताला आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे.
टी-20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहू शकता.
त्याच वेळी, डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने आणि उपांत्य फेरी आणि अंतिम सामने विनामूल्य पाहू शकतील.
डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
संबंधित बातम्या