भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थ येथे पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून यात ५ सामने खेळवले जाणार आहेत.
या मालिकेतील पहिलाच सामना पर्थ स्टेडियमच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल, ज्याच्या तयारीसाठी टीम इंडिया प्रचंड घाम गाळत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात पोहोचल्यापासून टीम इंडियाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खरं तर, टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानला गुरुवारी (१४ नोव्हेंबर) WACA येथे भारताच्या सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करताना कोपराला दुखापत झाली.
'फॉक्स क्रिकेट'ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सरफराज नेटमधून उजवा हात धरून बाहेर पडताना दिसत होता. यावेळी तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. मात्र, दुखापत गंभीर नसून फलंदाजाला एमआरआय करण्याची गरज नसल्याचे कळले आहे.
पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता असल्याने पर्थ येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत सरफराज खेळू शकतो.
जर रोहित मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल, तर लोकेश राहुलला यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात करण्यास सांगितले जाऊ शकते, ज्यामुळे मधल्या फळीत सरफराजसाठी जागा निर्माण होईल.
मात्र, सरफराजप्रमाणे केएल राहुल यालाही पर्थ कसोटी सामन्यापूर्वी दुखापतीचा सामना करावा लागला होता. शुक्रवारी सकाळी वाका, पर्थ येथे सराव करताना केएल राहुलला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यापूर्वी सेंटर विकेट मॅच सिम्युलेशन दरम्यान केएलला उजव्या कोपराला दुखापत झाली.
त्यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांमध्ये टेन्शन वाढले आहे. याआधी टीम इंडिया पर्थमध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत अ विरुद्ध सामना खेळणार होती पण तो रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघाने पर्थमध्ये सेंटर विकेट मॅच सिम्युलेशनचा सराव करण्याचा निर्णय घेतला.