पर्थ कसोटीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एक नवा विक्रम रचला आहे. पर्थ कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बुमराहने ॲलेक्स कॅरीची शिकार करून दिग्गज गोलंदाजांना मागे सोडले.
पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात १५० धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाही त्यांच्या पहिल्या डावात संघर्ष करताना दिसत आहे.
पहिल्याच दिवशी बुमराहने ४ विकेट घेत ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. बुमराहने या कसोटी सामन्यात ५ विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे.
बुमराहने आता कसोटीत ११ व्यांदा ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी बुमराहने डिसेंबर २०१८ मध्ये मेलबर्न कसोटी सामन्याच्या एका डावात ६ विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.
पर्थ कसोटीत ५ विकेट घेताच बुमराहने कपिल देव यांच्या महान विक्रमाची बरोबरी केली आहे. SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक ५ बळी घेण्याच्या बाबतीत बुमराह आता कपिल देव यांच्या बरोबरीला पोहोचला आहे. दोन्ही गोलंदाजांनी SENA देशांमध्ये प्रत्येकी ७ वेळा ५ बळी घेतले आहेत.
७ वेळा - जसप्रीत बुमराह (५१ डाव)*
७ वेळा - कपिल देव (६२ डाव)
बुमराहने कसोटीत सर्वाधिक वेळा ५ बळी घेण्याच्या बाबतीत इशांत शर्मा आणि झहीर खान यांची बरोबरी केली आहे. या तिन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ११ वेळा कसोटी सामन्याच्या एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आता बुमराह दुसऱ्या डावातही ५ बळी घेण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. असे केल्यास तो इशांत आणि झहीर खानला मागे सोडेल.