भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. यामधील बॉक्सिंग डे कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.
अशा स्थितीत दोन्ही संघ मेलबर्न कसोटी जिंकून आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतील. विशेषत: टीम इंडियासाठी मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करण्याचीही उत्तम संधी आहे.
मात्र, यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना दमदार कामगिरी करावी लागणार आहे. विशेषत: जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना. मेलबर्नच्या मैदानावर या दोन खेळाडूंनी आपली जादू दाखवली तर संघाचे काम सोपे होईल. यासोबतच या दोघांनाही कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
जसप्रीत बुमराह सध्या बॉर्डर-गावस्कर यांच्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी करत आहे. बुमराह हा या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. बुमराहने मालिकेतील तीन सामन्यांत २१ बळी घेतले आहेत. बुमराह मेलबर्नमध्ये भारताकडून कारकिर्दीतील ४४वी कसोटी खेळणार आहे.
या फॉरमॅटमध्ये बुमराहच्या नावावर १९४ विकेट आहेत. अशा परिस्थितीत या भारतीय महान खेळाडूला २०० चा आकडा गाठण्यासाठी फक्त ६ विकेट्सची गरज आहे. बुमराह ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे मेलबर्नमध्ये तो ही कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
बुमराहसोबतच रवींद्र जडेजाही मेलबर्न कसोटी सामन्यात चमत्कार करू शकतो. या सामन्यात जडेजा टीम इंडियासाठी ६०० आंतरराष्ट्रीय विकेट घेण्याचा पराक्रम करू शकतो.
ही कामगिरी करण्यासाठी जडेजाला फक्त ७ विकेट्सची गरज आहे. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही डावांत ७ विकेट घेतल्यास तो भारतासाठी ६०० आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरेल.
संबंधित बातम्या