टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (२४ जून) भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. सेंट लुसियाच्या डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी धुव्वा उडवला आणि सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली.
भारताने रोहित शर्माच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ विकेट गमावून २०५ धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ २० षटकांत ७ विकेट गमावून १८१ धावाच करू शकला आणि त्यांना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने ४३ चेंडूंत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. त्याने कर्णधार मिचेल मार्शसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. एकेकाळी ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत स्पर्धेत आपली विजयी मोहीम सुरू ठेवली.
भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ३, तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने २ बळी घेतले.
१७व्या षटकात १५० धावांवर ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट पडली. ट्रॅव्हिस हेड ४३ चेंडूत ७६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १८ चेंडूत ५३ धावा करायच्या आहेत. कांगारूंची धावसंख्या आता ५ विकेटवर १५३ धावा आहे.
९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवने मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अक्षर पटेलने सीमारेषेवर मार्शचा अप्रतिम झेल घेतला. मार्श २८ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाची ९ षटकांत २ बाद ८७ धावा आहे.
८ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर ८३ धावा आहे. मिचेल मार्श २४ चेंडूत ३५ धावांवर खेळत आहे. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. तर ट्रॅव्हिस हेड १८ चेंडूत ४० धावांवर खेळत आहे. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७२ चेंडूत १२३ धावा करायच्या आहेत.
अर्शदीप सिंगने पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला स्लिपमध्ये झेलबाद केले. अवघ्या सहा६ धावांत ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावली. ६ चेंडूत ६ धावा करून वॉर्नर बाद झाला. आता ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श क्रीजवर आहेत.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या ९२ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. या सामन्यात भारताने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विश्वचषकात भारताने २०० धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जोश हेझलवूडने विराट कोहलीला शुन्यावर बाद करून कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. मात्र, रोहित आज वेगळ्याच रंगात दिसला आणि त्याने तुफानी फलंदाजी करत कांगारू संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
रोहितने स्टार्कच्या षटकात २९ धावा केल्या आणि जोरदार फलंदाजी सुरू ठेवली. रोहित एकेकाळी शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने त्याचा डाव संपवला. रोहितने ४१ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकार मारले. २०० षटकार मारणारा रोहित पहिला फलंदाज ठरला. रोहित बाद झाल्यानंतर भारताचा डाव थोडा मंदावला असला तरी सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी काही चांगले फटके खेळले आणि संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली.
त्याचवेळी विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि स्पर्धेत दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि स्टॉइनिसने प्रत्येकी २ बळी घेतले.
जोश हेझलवूडने १६व्या षटकात केवळ ४ धावा दिल्या. १६ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा आहे. शिवम दुबे १५ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला आहे. तर हार्दिक पांड्या ६ चेंडूत ४ धावांवर खेळत आहे.
टीम इंडियाची तिसरी विकेट १२व्या ओव्हरमध्ये १२७ रन्सवर पडली. रोहित शर्माचे शतक हुकले. तो ४१ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ८ षटकार आले. रोहित मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला.
११ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १२७ धावा आहे. रोहित शर्मा ३९ चेंडूत ९२ धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले आहेत. सूर्यकुमार यादव ८ चेंडूत १७ धावांवर खेळत आहे. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला आहे.
रोहित शर्माने अवघ्या १९चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. आतापर्यंत त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले आहेत. तर ऋषभ पंत ७ धावांवर आहे. टीम इंडियाचा स्कोअर ६ ओव्हरमध्ये एका विकेटवर ६० रन्स आहे. पॅट कमिन्सच्या षटकात एकूण १५ धावा आल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार मारणारा रोहित आता जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
तिसऱ्या षटकात रोहित शर्माने मिचेल स्टार्कवर आक्रमण केले. हिटमॅनने या षटकात ४ षटकार आणि १ चौकार लगावला. या षटकात एकूण २९ धावा झाल्या. ३ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर ३५ धावा आहे. रोहित शर्मा ११ चेंडूत ३४ धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला मोठा धक्का दिला. वेगवान गोलंदाज जोश हेडलवूडच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्नात विराट कोहली झेलबाद झाला. कोहलीने ४ चेंडू खेळले मात्र त्याला खातेही उघडता आले नाही. भारताने आपली सुरुवातीची विकेट ६ धावांवर गमावली. या टी-20 विश्वचषकात कोहली शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही दुसरी वेळ आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.
सुपर ८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. संघाने ॲश्टन एगरच्या जागी मिचेल स्टार्कचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. दुसरीकडे, भारताने या सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ डॅरेन सॅमी स्टेडियमवर पोहोचले आहेत. या सामन्याचा नाणेफेक काही वेळाने होणार आहे. पावसाची शक्यता आहे, मात्र सध्या हवामान निरभ्र आहे.
सेंट लुसियामध्ये पाऊस थांबला आहे. ही चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे. येथे सकाळी पाऊस पडला होता, परंतु आता हवामान स्वच्छ आणि सूर्यप्रकाश आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता असली तरी सध्या हवामान स्वच्छ आहे.
तत्पूर्वी रविवारी अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीचा दावा ठोकला. आता त्यांना बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. जर त्यांनी हा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर त्यांचा नेट रनरेट सुधारेल आणि त्यांच्या खात्यात ४ गुण होतील. दुसरीकडे, भारताला ऑस्ट्रेलियाला कोणत्याही किंमतीत पराभूत करावे लागेल. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशा बळकट होतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १९ सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने ११ सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर भारताने ३ सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने केवळ २ सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. अशा स्थितीत भारताला आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे.
संबंधित बातम्या