टीम इंडियाने पर्थ कसोटी जिंकली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २३८ धावांत गारद केले आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिली कसोटी २९५ धावांनी जिंकली. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयाासठी ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण कांगारूंना ते गाठता आले नाही.
भारतीय संघासाठी पहिल्या डावात ५ बळी घेणारा कर्णधार जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावातही हिरो ठरला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३८ धावांत आटोपून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला.
नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने पर्थ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाने कसोटी सामना हरण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियातील धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताला यापूर्वी असा विजय मिळाला नव्हता.
५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. पदार्पण करणारा नॅथन मॅकस्विनी आपले खातेही उघडू शकला नाही आणि डावाच्या पहिल्याच षटकात बुमराहचा बळी ठरला.
त्यानंतर नाइटवॉचमन पॅट कमिन्सला (२) मोहम्मद सिराजने पॅव्हेलियनमध्ये परतवले. तिसऱ्या दिवसाची शेवटची विकेट बुमराहचा बळी ठरलेल्या मार्नस लॅबुशेनच्या (३) रूपाने पडली.
सामन्याच्या चौथ्या दिवशी (२५ नोव्हेंबर) म्हणजेच आज सकाळच्या सत्रात मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करत सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि खराब फॉर्ममध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
मोहम्मद सिराजने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजा (४) याला बाद केले. अशाप्रकारे १७ धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. यानंतर स्टीव्ह स्मिथ (१७) आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी ६७े धावांची भागीदारी केली.
पण ही जोडी धोकादायक दिसत असतानाच सिराजने स्मिथला ७९ धावांवर ऋषभ पंतकडे झेलबाद केले. यानंतर ट्रॅव्हिस हेडला जसप्रीत बुमराहने यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या हाती झेलबाद केले. १६१ च्या स्कोअरवर हेडची विकेट पडली. यानंतर काही वेळातच मिचेल मार्श (४७) धावांवर बाद झाला.
अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. मार्श हा नितीश रेड्डीचा कसोटी क्रिकेटमधील पहिला विकेट ठरला. २२७ धावांवर मिचेल स्टार्क (१२) वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत अडकल्याने बाद झाला. जो ऑस्ट्रेलियन संघाला आठवा धक्का होता.
यानंतर सुंदरने लायनला (०) बाद करून ऑस्ट्रेलियाला ९वा धक्का दिला. शेवटची विकेट ॲलेक्स कॅरीच्या (३६) रूपाने पडली, जो भारताच्या दुसऱ्या डावात हर्षित राणाने बोल्ड केला, जसप्रीत बुमराहने ३ आणि मोहम्मद सिराजने ३ विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरला २ विकेट मिळाले. हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.