Basit Ali on Rohit Sharma and Gautam Gambhir : ब्रिस्बेन येथे खेळल्या जात असलेल्या गाबा कसोटीत भारतीय संघाच्या अडचणी वाढत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या.
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह वगळता अन्य कोणताही गोलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. बुमराहने ६ विकेट घेत संघाला काही प्रमाणात सांभाळले, पण ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपली पकड पूर्णपणे मजबूत केली आहे. भारताने तिसऱ्या दिवसअखेर ५१ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या.
यानंतर आता रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अली याने टीम इंडियाच्या रणनीती आणि कामगिरीवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, भारतीय संघाच्या अस्थिर कामगिरीचे प्रमुख कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील समन्वयाचा अभाव आहे.
बासित अली म्हणाला, "श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका असो किंवा न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका, रोहित आणि गंभीर सेम पेजवर असल्याचे दिसत नाहीत. राहुल द्रविड आणि रोहितमध्ये असे नव्हते, ते नेहमी एकमताने काम करायचे.
बासित अलीने संघ निवड आणि रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, "ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत तीन डावखुरे फलंदाज आहेत, तरीही वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन सारख्या ऑफस्पिनर्सना प्लेइंग-११ मध्ये का निवडण्यात आले नाही? त्याऐवजी रवींद्र जडेजाला मैदानात उतरवण्यात आले, जो ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरला.
बासित अली पुढे म्हणाले, "भारतीय संघ फक्त जसप्रीत बुमराहवर अवलंबून आहे. इतर गोलंदाजांना तशी कामगिरी करता येत नाही. याशिवाय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज नसणे ही देखील मोठी कमजोरी आहे."
गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णयही भारतीय संघाला महागात पडला. पहिल्या दिवशी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रोहितने गोलंदाजी करणे पसंत केले, पण भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या मदतीचा फायदा उठवता आला नाही.
स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने २४१ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. तर तिसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी ढासळली.
शुभमन गिल, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्या विकेट लवकर पडल्या. केएल राहुल (३०*) शिवाय एकही फलंदाज टिकू शकला नाही. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी भारतीय फलंदाजीचा शीर्ष क्रम गारद केला.