भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरा कसोटी सामना आजपासून (१४ डिसेंबर) ब्रिस्बेन येथे सुरू झाला आहे. मात्र, पहिल्या दिवशीच पावसाचा व्यत्यय आला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गब्बामध्ये कांगारू संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. यादरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गोलंदाजी करायला येताच गाबा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
सिराजसाठी ही ट्रोलिंग ॲडलेड कसोटी सामन्याशी संबंधित आहे. ॲडलेड कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला बाद केले तेव्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या घटनेनंतर सिराजला मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला.
ट्रॅव्हिस हेडलाही एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला. अशा परिस्थितीत ट्रॅव्हिस हेड आणि मोहम्मद सिराज यांच्यातील संघर्ष आता गब्बामध्येही पाहायला मिळत आहे.
ब्रिस्बेनमधील गाबा येथे दोन्ही संघ मैदानात उतरताच पावसामुळे खेळ थांबवावा लागला. काही वेळाने पुन्हा खेळ सुरू झाला, मात्र १३.२ षटकांनंतर पावसाने पुन्हा एकदा खेळात व्यत्यय आणला.
मैदान पाण्याने भरून गेल्याने लंच ब्रेकपर्यंत खेळ सुरू होऊ शकला नाही. उपाहाराच्या ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने कोणतेही नुकसान न करता २८ धावा केल्या होत्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने २९५ धावांनी विजय मिळवला. मात्र, ॲडलेडमध्ये कांगारू संघाने जोरदार पुनरागमन करत १० गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
संबंधित बातम्या