India vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. पण या कसोटीपूर्वी भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांनी शुभमन गिलला यशाचा मंत्र दिला आहे.
गिल बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दमदार कामगिरी करेल. सलामीवीर म्हणून कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणारा गिल तिसऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करेल, अशी आशा द्रविड यांनी व्यक्त केली.
पूर्वी या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा खेळत असे. पुजाराच्या जागी गिलला संधी देण्यात आली आहे. ३६ वर्षीय पुजारा बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघाबाहेर आहे. जून २०२३ मध्ये तो भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना माजी भारतीय प्रशिक्षक द्रविड यांनी, गिलला एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून संबोधले आणि गेल्यावेळी गाबा कसोटीत खेळलेल्या त्याच्या अविश्वसनीय ९१ धावांच्या खेळीचे कौतुक केले. या इनिंगनेच भारताच्या गाबा कसोटी विजयाचा पाया रचला होता.
द्रविड म्हणाला की, 'शुभमन गिल हा शानदार खेळाडू आहे. मागच्या वेळी ऑस्ट्रेलियात त्याला मोठे यश मिळाले होते. ऋषभच्या ८० (८९) धावांबद्दल प्रत्येकजण बोलतो आणि ते बरोबरही आहे, पण मला वाटते की शुभमनने ९१ धावांची खेळी त्या विजयाचा पाया रचणारी होती. तो एक गुणी खेळाडू आहे. तो शिकत आहे. तो माझ्यापेक्षा आणि पुजारापेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करतो पण तरीही तो खूप चांगला खेळाडू आहे.
द्रविडच्या मते, जर टॉप-४ मधील दोन फलंदाजांनी धावा केल्या तर टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी असेल. आगामी बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास द्रविडला आहे.
कूकाबुरा बॉल आणि त्या परिस्थितीत जर तुम्ही सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळू शकलात आणि त्या कालावधीत तुमचे अव्वल फलंदाज धावा करू शकले, तर ते तुमच्या खालच्या क्रमाला खेळावर नियंत्रण ठेवण्यास आणि वर्चस्व राखण्यास सक्षम करते.'
दरम्यान, शुभमन गिल मालिकेतील पहिल्या कसोटीत म्हणजेच, पर्थ कसोटी खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले. गिल इंट्रा स्क्वाड सामना खेळताना जायबंदी झाला होता.
२५ वर्षीय गिलने १४ सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर ४२.०९ च्या सरासरीने ९२६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली.
पहिला सामना, २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, ६ ते १० डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, १४ ते १८ डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, ३ ते ७ जानेवारी, सिडनी.