भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना शनिवारपासून (१४ डिसेंबर) ब्रिस्बेन येथील गाबा येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे ॲडलेडमध्ये ५ विकेट घेणाऱ्या स्कॉट बोलंड याला संघातून वगळण्यात आले आहे. जोश हेझलवूडचे संघात पुनरागमन झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल जोश हेझलवूडच्या रूपात झाला आहे. दुखापतीमुळे हेजलवूड ॲडलेड कसोटी खेळू शकला नव्हता, त्याच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलंडला संधी मिळाली होती, पण आता हेझलवूड तंदुरुस्त होऊन परतण्यासाठी तयार आहे, त्यामुळे बोलंडला बाहेर बसावे लागणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कमिन्स म्हणाला, '"हे कठीण आहे, त्याने ॲडलेडमध्ये चांगली कामगिरी केली. दुर्दैवाने गेल्या १८ महिन्यांत त्याने बराच वेळ बेंचवर घालवला आहे. आणि जेव्हा जेव्हा तो खेळला आहे, तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली आहे. स्कॉटीसाठी ही दुर्वेवी गोष्ट आहे, पण या मालिकेत अजून बरेच सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत त्याला पुढे संधी मिळू शकते.
पण आता जोश परत आला आहे. त्याला कसलाही त्रास झाला नाही. काल खूप चांगली गोलंदाजी केली, काही दिवसांपूर्वी ॲडलेडमध्ये चांगली गोलंदाजी केली. तो आणि वैद्यकीय टीम खूप आत्मविश्वासी आहे".
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पर्थ कसोटी तब्बल २९५ धावांनी जिंकून भारताने मालिकेत शानदार सुरुवात केली होती, पण ॲडलेड कसोटीत कांगारूंनी टीम इंडियाला १० गडी राखून पराभूत करत दमदार पुनरागमन केले. मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन - उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेझलवूड.