भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरुवात केली. पण पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले.
हे वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ बाद २७९ धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी फलंदाजी करत होते.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, एकदिवसीय विश्वचषकाची फायनल आणि त्यानंतर बॉर्डर गावस्कर मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडसाठी आजचा दिवस चांगला नव्हता.
भारतीय गोलंदाजांना सतावणारा ट्रॅव्हिस हेड आज लवकर बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. बुमराहने त्याला क्लीन बोल्ड केले.
ऑस्ट्रेलियन डावाच्या ६७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हेड बाद झाला. तर त्याआधी ६६व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने मार्नस लॅबुशेनला (७२) बाद केले. यानंतर ट्रॅव्हिस हेड मैदानात आला. त्याने सुंदरच्या या षटकातील ५ चेंडूंचा सामना केला, मात्र त्याला खाते उघडता आले नाही. पुढच्याच षटकात कर्णधार रोहित शर्माने बुमराहकडे चेंडू सोपवला.
स्मिथने बुमराहचा पहिला चेंडू खेळला आणि ३ धावा घेतल्या. यानंतर दुसऱ्या चेंडूवर हेडला धावा करता आल्या नाहीत, तर तिसऱ्या चेंडूवर हेड बोल्ड झाला. खरं तर, त्याला वाटलं की चेंडू बाहेर जाईल. अशा स्थितीत त्याने बॅट वर करून चेंडू सोडून दिला पण, चेंडू भरकन् आता आला आणि बेल्स उडाली.
तत्पूर्वी, हेडने या मालिकेत दोन शतके झळकावली आणि एकट्याने भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. त्याने ब्रिस्बेन गाबा येथे १५२ धावांची खेळी खेळली, तर ॲडलेड डे-नाईट कसोटीत त्याने १४० धावा केल्या होत्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. १९ वर्षीय नवोदित सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध काही उत्कृष्ट शॉट्स मारले. डावाच्या सातव्या षटकात जसप्रीत बुमराहविरुद्ध स्वीच हिटद्वारे कॉन्स्टासने दोन चौकार आणि एक षटकार मारला.
त्यानंतर ११व्या षटकात बुमराहच्या चेंडूवर कॉन्स्टासने एकूण १८ धावा दिल्या. कॉन्स्टासने आपली झंझावाती फलंदाजी सुरू ठेवत अवघ्या ५२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, यानंतर कॉन्स्टास जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि ६० धावांवर बाद झाला.
मात्र, यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन यांनी सावध खेळ करत दोघांनी ६५ धावांची भागीदारी केली. दरम्यान, बुमराह पुन्हा एकदा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरला आणि त्याने उस्मान ख्वाजाला बाद केले.
यानंतर भारतीय संघाला पुन्हा तिसरी विकेट घेण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली, परंतु या सामन्यात खेळत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने मार्नस लॅबुशेनला आपल्या फिरकीवर झेलबाद केले. २३७ च्या स्कोअरवर लॅबुशेन ७२ धावा करून बाद झाला. तर ट्रॅव्हिस हेड शुन्यावर बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. हेड बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २४०/४ झाली. काही वेळाने बुमराहनेही मिचेल मार्शला स्वस्तात बाद केले. ऑस्ट्रेलियाने अवघ्या ९ धावांच्या फरकाने ३ महत्वाचे फलंदाज गमावले.
संबंधित बातम्या