भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. कारण ५ सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
भारतीय संघाने २०२४-२५ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात धमाकेदार विजयाने केली होती. भारताने पर्थ कसोटी २९५ धावांनी जिंकली. मात्र, कांगारूंनी पुढची कसोटी १० गडी राखून जिंकली आणि जोरदार पलटवार केला. त्यानंतर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता मेलबर्नमध्ये दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील.
मेलबर्नमध्ये टीम इंडिया दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. येथील खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करते. मेलबर्नमध्ये भारताने शेवटचा कसोटी सामना जिंकला होता, तेव्हाही प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला होता.
अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याच रणनीतीची पुनरावृत्ती करू शकतो. अशा स्थितीत रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनाही संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
टीम इंडियाला दोन फिरकीपटूंसोबत खेळायचे असेल, तर मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांच्यातील एका वेगवान गोलंदाजाला वगळावे लागेल. अशा स्थितीत सिराजच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण या दौऱ्यावर तो अद्याप आपल्या जुन्या लयीत दिसलेला नाही.
याशिवाय शुबमन गिल यालाही बाहेर ठेवले जाऊ शकते. गिलला बऱ्याच दिवसांपासून कसोटीत मोठी खेळी खेळता आलेली नाही.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह.
संबंधित बातम्या