भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ब्रिस्बेनमध्ये खेळली जात आहे, परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी (१४ डिसेंबर) पावसाने अडथळा आणला. मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ १३.२ षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावा केल्या.
आता प्रश्न असा आहे की, दुसऱ्या दिवशी (१५ डिसेंबर) ब्रिस्बेनमध्ये हवामान कसे असेल? दुसऱ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय येणार की खेळाडू आणि चाहत्यांना मोकळ्या आकाशात खेळाचा आनंद घेता येणार आहे?
भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की दुसऱ्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एका वेबसाइटनुसार, रविवारी पावसाची शक्यता केवळ ८ टक्के आहे, परंतु दिवसभर आकाश ढगाळ राहू शकते.
असे असले तरी अनेक वेळा हलक्या पावसामुळे खेळ थांबण्याची शक्यता आहे. एकूणच, दुसऱ्या दिवशीही संपूर्ण षटके क्वचितच टाकली जातील. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात जोरदार वारे वाहत होते आणि दुसऱ्या दिवशीही ताशी १५ किमी वेगाने वारे वाहू शकतात.
पहिल्या दिवशी गाबा मैदान तलावासारखे दिसत होते. खेळपट्टीभोवतीचे संपूर्ण मैदान पाण्याने भरलेले दिसत होते. गाबा मैदानाची ड्रेनेज व्यवस्था जागतिक दर्जाची आहे, मात्र रात्री उशिराही पाऊस झाल्यास दुसऱ्या दिवसाचा खेळ उशिराने सुरू होऊ शकतो.
मैदानाची स्थिती लक्षात घेता दिवसाचा उर्वरित खेळ आता अर्धा तास आधी सुरू होईल.
पहिल्या दिवशीचा खेळ वाया गेल्यानंतर सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आली आहे. आता उर्वरित ४ दिवसांचा खेळ ठाराविक वेळेपेक्षा अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच, आता दुसऱ्या दिवशीचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे ५:१५ वाजता सुरू होणार आहे. सोबतच, आता एका दिवसात ९८ षटके टाकले जातील आणि आजच्या दिवसाची भरपाई केली जाईल.
संबंधित बातम्या