IND vs AUS 2nd Test Day 2 Match Report : ॲडलेड डे नाईट कसोटीत टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. आज (७ डिसेंबर) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात १२८ धावा केल्या आहेत, तर त्याचे टॉप-५ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा २९ धावांनी पिछाडीवर आहे, तर आता टीम इंडियाकडे फक्त ५ फलंदाज शिल्लक आहेत.
भारताच्या दुसऱ्या डावात दिवसअखेर ऋषभ पंत २८ धावा आणि कर्णधार नितीश कुमार रेड्डी १५ धावांसह नाबाद परतले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत पॅट कमिन्स आणि स्कोर बोलँडने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत, तर मिचेल स्टार्कनेही एक विकेट घेतली आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा (६ डिसेंबर) खेळ संपेपर्यंत १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या. भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली कारण नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ लवकरच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.
मार्नस लॅबुशेनने ६४ धावांचे अर्धशतक झळकावले, पण ट्रेव्हिस हेड चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. ९९ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना हेडने १४० धावा केल्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक होते.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. राहुल अवघ्या ७ धावा करून बाद झाला आणि त्याच्याशिवाय विराट कोहली केवळ ११ धावा करू शकला. जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी अनुक्रमे २४ आणि २८ धावा केल्या.
भारतीय फंलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरले. कॅप्टन रोहित शर्मा क्रीजवर आल्यापासून संघर्ष करताना दिसला, त्याला पॅट कमिन्सने ६ धावांवर क्लीन बोल्ड केले. आता भारत पराभवापासून फक्त ५ विकेट दूर आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंत वेळोवेळी टीम इंडियाचा तारणहार ठरला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंतने २८ धावा केल्या असून तो सध्या ११२ च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. त्याच्यासोबत नितीश कुमार रेड्डी यानेही १४ चेंडूत १५ धावा केल्या आहेत. दोघांनी वेगवान फटके मारण्याचा प्रयत्न केला. डावाचा पराभव टाळण्यासाठी टीम इंडियाला किमान २९ धावा कराव्या लागतील.
संबंधित बातम्या