T20 World Cup 2024: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात येत्या ११ जानेवारीपासून ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीत खेळवला जाणार आहे. ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर भारत टी-२० विश्वचकापर्यंत कोणतीही टी-२० मालिका खेळणार नाही. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे आगामी विश्वचषकासाठी चांगला संघ तयार करण्यात मदत होऊ शकेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल. हे दोघेही आगामी विश्वचषकात खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर निवड समितीच्या अडचणी वाढणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळल्यास यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह या युवा खेळाडूंना बाहेर बसावे लागेल. दोघेही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. याशिवाय, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड हे फलंदाजी फीट झाल्यानंतर पुनरागमनासाठी सज्ज होतील. अशा परिस्थितीत निवड समितीसमोर संघ निवडण्याचे आव्हान असेल.
याशिवाय, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि इशान किशन सारखे खेळाडूही दमदार फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत केएल राहुल भारतासाठी यष्टिरक्षक म्हणून खेळत होता. मात्र, अफगाणिस्तान मालिकेसाठी राहुलची निवड झाली नाही. या मालिकेत जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यष्टिरक्षक म्हणून असतील. जितेश शर्माने बरेच सामने खेळलेले नाहीत, तर संजू सॅमसनची टी-२० कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे.
भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज हे अफगाणिस्तान मालिकेत खेळणार नाहीत. म्हणजेच गोलंदाजांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे किमान अफगाणिस्तान मालिकेत तरी मिळणार नाही. अष्टपैलू रवींद्र जाडेजा या मालिकेत खेळणार नाही. या मालिकेत अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे गोलंदाज असतील.