इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी धुमाकूळ घालत अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ६ विकेटने पराभव केला. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका २-० अशी खिशात घातली आहे.
यानंतर आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १७ जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. तर पहिला सामना मोहाली येथे झाला होता, यात भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला होता.
विशेष म्हणजे, उभय संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय टी-20 मालिका आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला आता क्लीन स्वीपची संधी आहे.
इंदूरमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात भारतीय संघाला १७३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या १५.४ षटकांत ४ गडी गमावून सामना जिंकला. या सामन्याचे हिरो यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे होते. यशस्वीने २७ चेंडूत अर्धशतक तर शिवमने २२ चेंडूत अर्धशतक केले.
या सामन्यात यशस्वीने ३४ चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली. त्याने ६ षटकार आणि ५ चौकार मारले. तर शिवमने ३२ चेंडूत ६३ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. याशिवाय विराट कोहलीने २९ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून करीम जनातने २ बळी घेतले.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. गुलबदिन नायबने २८ चेंडूत अर्धशतक केले. या सामन्यात त्याने ३५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. मुजीब उर रहमानने ९ चेंडूत २१ आणि करीम जनातने १० चेंडूत २० धावा फटकावल्या.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचे महत्वाचे फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. कर्णधार इब्राहिम झद्रान ८ धावा करून बाद झाला तर अजमतुल्ला ओमरझाई दोन धावा करून बाद झाला.
भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी २ विकेट मिळाले. शिवम दुबेने एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या