भारतीय संघाने सुपर-८ मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८१ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकात ९ बाद १३४ धावाच करू शकला. भारताने हा सामन ४७ धावांनी जिंकला.
दोन्ही संघांचा सुपर-८ फेरीतील हा पहिलाच सामना होता. आता भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध २२ जूनला आपला पुढचा सामना खेळायचा आहे. हा सामना अँटिग्वा येथे होणार आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, विशेषत: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्या षटकापासून विकेट घेण्यास सुरुवात केली.
तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईने सर्वाधिक २६ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. तर भारतीय संघाकडून बुमराह आणि अर्शदीप सिंगने ३-३ विकेट घेतल्या. कुलदीप यादवला 2 यश मिळाले. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी १ बळी घेतला.
तत्पूर्वी, सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक आणि हार्दिक पांड्यासोबतची भागीदारी यांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ८ टप्प्यातील सामन्यात २० षटकांत ८ गडी गमावून १८१ धावा केल्या.
सूर्यकुमार २८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय भारताचा उपकर्णधार हार्दिकने २४ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. शेवटी अक्षर पटेलने काही चांगले फटके खेळले ज्याच्या जोरावर भारताला १८० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.
या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने ११ धावांवर रोहित शर्माच्या (८) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर ऋषभ पंत (२०) आणि विराट कोहली (२४) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर १९ धावांत ४ गडी गमावल्याने पुन्हा एकदा संघ अडचणीत दिसत होता.
यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने डावाची सुत्रे हाती घेतली. दोघांमध्ये ३७ चेंडूत ६० धावांची भागीदारी झाली. सूर्याने २७ चेंडूत सलग दुसरे अर्धशतक झळकावले. तो २८ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. सूर्याने ३ षटकार आणि ५ चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट १८९.२८ होता.
अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी ३ बळी घेत भारतीय फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. मात्र, सूर्यकुमार यादव आणि हार्दिकने पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.