India Vs Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १७२ धावा केल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी १७३ धावा करायच्या आहेत.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. गुलबदिन नायबने २८ चेंडूत अर्धशतक केले. या सामन्यात त्याने ३५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. मुजीब उर रहमानने ९ चेंडूत २१ आणि करीम जनातने १० चेंडूत २० धावा फटकावल्या.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचे महत्वाचे फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. कर्णधार इब्राहिम झद्रान ८ धावा करून बाद झाला तर अजमतुल्ला ओमरझाई दोन धावा करून बाद झाला.
भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी २ विकेट मिळाले. शिवम दुबेने एक विकेट घेतली. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालचे पुनरागमन झाले आहे. कोहली आणि यशस्वी यांच्यासाठी शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांना वगळण्यात आले आहे.