१९ वर्षांखालील आशिया चषकाचा तिसरा सामना आज शनिवारी (३० नोव्हेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा ४४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना खेळताना २३७ धावांवर गारद झाला.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांना पहिल्या ३० षटकात एकही बळी घेता आला नाही. पाकिस्तानचा सलामीवीर शाहजेब खान आणि उस्मान खान यांच्यात पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी झाली.
पण आयुष म्हात्रेने ही भागीदारी ३१व्या षटकात मोडली. त्याने उस्मान खानला आपला बळी बनवला. १७० धावांवर पाकिस्तानची दुसरी विकेट पडली. हारून अर्शदने ३ धावा केल्या.
मोहम्मद रियाझुल्ला ४४व्या षटकात २७ धावा काढून बाद झाला. फरहान युसूफ गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फहम उल हकने ४ धावा, कर्णधार साद बेगने ४ धावा आणि शाहजेब खानने १५९ धावा केल्या. शाहजेब खानने या डावात ५ चौकार आणि १० षटकार मारले.
तर उमर झैबने २ धावा करून नाबाद राहिला आणि नावेद अहमद खानने ५ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. भारताकडून समर्थ नागराजने ३ बळी घेतले. आयुष म्हात्रेने २ तर युधजित गुहा आणि किरण चोरमले यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
२८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. २८ धावांवर संघाला पहिला धक्का बसला. सलामीवीर आयुष म्हात्रेने १४ चेंडूत २० धावांची खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून ५ चौकार आले. अब्दुल सुभानने त्याची विकेट घेतली. भारतीय संघाची दुसरी विकेट ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पडली. वैभव सूर्यवंशीने ९ चेंडूंचा सामना करत १ धाव काढली.
निखिल कुमार भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने ७७ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. निखिलने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.
यानंतर आंद्रे सिद्धार्थने २७ चेंडूत १५ धावा, कर्णधार मोहम्मद अमनने १६ धावा, किरण चोरमलेने २० धावा, हरवंश सिंगने २८ चेंडूत २६ धावा केल्या. समर्थ नागराज यांचे खातेही उघडले नाही. तसेच हार्दिक राज १० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.