इमर्जिंग आशिया चषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ओमानच्या क्रिकेट ग्राउंडवर भारत अ संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ८ बाद १८३ धावा केल्या. भारताकडून कर्णधार तिलक वर्मा याने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली.
पण तत्पूर्वी, भारत अ संघाचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांनी वादळी सुरुवात केली होती. या दरम्यान, अभिषेक शर्माचा एका पाकिस्तानी खेळाडूसोबत वाद झाला.
अभिषेकने २२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावांची जलद खेळी खेळली. मात्र, पाकिस्तानचा चायनामन फिरकीपटू सुफियान मुकीन याने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि बाद केले. पाकिस्तानच्या कासिम अक्रमने अभिषेकचा उत्कृष्ट झेल घेतला.
या दरम्यान सगळं ठीक चालले होते. पण अभिषेक शर्मा आऊट होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने माघारी जात होता, त्यावेळी पाकिस्तानी खेळाडू सुफियान मुकीनने घाणेरडे कृत्य केले. अभिषेकला बाद केल्यानंतर सुफियानने आनंद साजरा केला आणि त्याला परत जाण्याचा इशारा केला. मग काय, अभिषेकनेही अंपायरसमोरच सुफियानला चांगलच सुनावलं. यानंतर अंपायरने दोघांना शांत केले, त्यानंतर अभिषेक शर्मा शांत होऊन तंबूत परतला.
विशेष म्हणजे, अभिषेक शर्माने आऊट होण्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अब्बास आफ्रिदीला चांगलेच फटकावले होते. सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या अब्बासच्या गोलंदाजीवर अभिषेकने पहिल्या ५ चेंडूंत २ षटकार, दोन चौकारांसह २१ धावा वसूल केल्या होत्या.
यानंतर प्रभासिमरन सिंगनेही शेवटच्या चेंडूवर चौकार मारत षटकात २५ धावा पूर्ण केल्या. अभिषेक आणि प्रभासिमरनच्या फटकेबाजीने पाकिस्तानी गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले होते. यामुळेच पाकिस्तानी संघाने जेव्हा अभिषेक शर्माची विकेट घेतली तेव्हा उत्साहाच्या भरात भान हरपून बसले होते.
भारत- अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रमणदीप सिंग, अंशुल कंबोज, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, निशांत सिंधू, राहुल चहर, रसिक दार सलाम, वैभव अरोरा
पाकिस्तान- हैदर अली, मोहम्मद हारिस (विकेटकीपर-कर्णधार), यासिर खान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, अब्दुल समद, अराफत मिन्हास, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद इम्रान, जमान खान, सुफियान मुकीम.
संबंधित बातम्या