भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नयेथे खेळला जात आहे. आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी लक्षात घेऊन मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांना संधी देण्यात आली.
ध्रुव जुरेलने पहिल्या डावात ८० धावा करत ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेतले. पण तरी केएल राहुलचा फ्लॉप शो सुरूच आहे. केएल राहुल पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारत अ सह टीम इंडियाचे व्यवस्थापन अडचणीत आले आहे.
केएल राहुल ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दुसऱ्या डावात अत्यंत खराब पद्धतीने बाद झाला. तो ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून असे दिसते की, फॉर्मसोबतच केएल राहुलकडे आत्मविश्वासाचाही अभाव आहे.
भारत अ संघाच्या दुसऱ्या डावात केएल राहुल विचित्र पद्धतीने बाद झाला. सामन्याच्या पहिल्या डावात राहुलच्या बॅटमधून फक्त ४ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या डावात तो खेळपट्टीवर उभा होता. पण यादरम्यान, एक चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पीच होऊन ऑफ स्टंम्पवर आदळला.
वास्तविक, ऑफस्पिनर कोरी रोचिओलीचा चेंडू लेग स्टंपच्या लाईनवर पडून बाहेर जात होता. पण राहुलने पॅडच्या साह्याने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण चेंडू पॅडच्या मधून चेंडू ऑफ स्टंपला लागला.
केएल राहुल बाद झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही हसू आवरता आले नाही. विकेट पडल्याने समालोचकांनाही आश्चर्य वाटले. राहुलला बोल्ड केल्यानंतर, समालोचक म्हणाला - मला माहित नाही कसे पण तो बाद झाला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या डावात केवळ १६१ धावा केल्या. या १६१ पैकी ८० धावा ध्रुव जुरेलच्या होत्या. जुरेल वगळता कोणत्याही फलंदाजाला पहिल्या डावात ३० धावांचा टप्पा गाठता आला नाही.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २२३ धावा करत ६२ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताला ही आघाडी पूर्ण करण्यात यश आले.
दुसऱ्या अनौपचारिक सामन्याच्या पहिल्या डावात भारत अ संघाचे अव्वल ४ फलंदाज ११ धावांवर बाद झाले. दुसऱ्या डावातही संघाची सुरुवात खराब झाली. ५६ धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिमन्यू ईश्वरनने १७ धावा, साई सुदर्शनने ३ धावा, ऋतुराज गायकवाडने ११ धावा आणि देवदत्त पडिक्कलने १ धाव केली.