छत्रपती संभाजीनगर येथून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. येथे एका ३५ वर्षीय व्यावसायिक क्रिकेटर इम्रान पटेल याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बुधवारी इम्रान पटेल साखळी सामन्यात आपल्या संघासाठी सलामीला आला होता. या सामन्यता काही षटके खेळल्यानंतर त्याने त्याचा डावा हात आणि छातीत दुखत असल्याचे सांगत मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.च
तो मैदानातून बाहेर जात असताना खाली पडला. यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी इम्रान पटेल यांना मृत घोषित केले.
इम्रानचा सहकारी क्रिकेटपटू नसीर खानने सांगितले की, आतापर्यंतच्या इतिहासात इम्रान पटेल याला आरोग्याशी संबंधित कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासले नव्हते. त्याची शारीरिक तंदुरुस्ती देखील चांगली होती, तो एक अष्टपैलू खेळाडू होता आणि त्याला क्रिकेट खेळाची खूप आवड होती. असं अचानक कसं होऊ शकतं, हे कुणालाच समजत नाही, असं नसीर खान सांगतात.
छत्रपती संभाजी नगर येथील गरवारे स्टेडियमवर लकी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात हा सामना खेळला जात होता, इम्रान पटेल हा लकी इलेव्हन संघाचे नेतृत्व करत होता आणि डावाच्या सहाव्या षटकात त्याने २ चांगले चौकारही मारले होते, त्याने सामन्यात २६ धावा केल्या.
इम्रान पटेल विवाहित असून त्याला ३ मुली आहेत. त्याची सर्वात लहान मुलगी अवघ्या ४ महिन्यांची आहे. पटेल त्याच्या क्षेत्रात खूप लोकप्रिय होते आणि रिअल इस्टेट व्यवसायातही तो सक्रिय होता. त्याचे स्वतःचे ज्यूसचे दुकान देखील आहे.
याच वर्षी सप्टेंबरमध्ये हबीब शेख खेळाडूचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हबीबला मधुमेहाचा त्रास होता, मात्र इम्रान पूर्णपणे निरोगी होता.