Virat Kohli Captaincy And R Ashwin Retirement : टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ब्रिस्बेनच्या गाबा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर अश्विनने अचानक निवृत्तीचा बॉम्ब टाकला. भारतीय फिरकीपटूने बुधवारी (१८ डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.
आता अश्विनच्या निवृत्तीनंतर सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानकडून मोठा दावा करण्यात आहे. विराट कोहली जर टीम इंडियाचा कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती, असे यात म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, विराट कोहली जर टीम इंडियाचा कर्णधार असता तर त्याने अश्विनला मालिकेच्या मध्यभागी निवृत्ती घेण्यापासून रोखले असते कारण टीम इंडियाला सिडनी कसोटीत त्याची गरज होती.
त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाले, "मी हमी देतो की विराट कोहली कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्तीची परवानगी दिली नसती आणि त्याला दोन सामन्यांनंतर निवृत्तीची घोषणा करण्यास सांगितले असते.'
असे का? कारण भारताला सिडनीत त्यांची गरज आहे. जर रवी शास्त्री आणि राहुल द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक असते तर त्यांनीही अश्विनला निवृत्त होऊ दिले नसते.
बासित अली पुढे म्हणाले, “हे चुकीचे आहे की रोहित शर्मा आणि गौतम गंभीरने त्याचे मन वळवले नाही. 'आताच नको, पुढील सामन्यांमध्ये विशेषत: सिडनीमध्ये तुझी गरज आहे, असे त्याला सांगायला हवे होते.”
बासित अली पुढे म्हणाले, "अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सांगू शकत नाही, पण तरीही समजू शकता. बॉडी लँग्वेज सर्वकाही सांगते. त्याने विराट कोहलीला ज्या पद्धतीने मिठी मारली, ते खूप काही सांगून जाते."
रविचंद्रन अश्विन हा भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने आपल्या कारकिर्दीत ५३७ कसोटी विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्यांच्या यादीत माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने ६१९ बळी घेतले.
संबंधित बातम्या