South Africa vs England : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज (१ मार्च) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. अफगाणिस्तान संघाचीही या सामन्यावर नजर असणार आहे. कारण आतापर्यंत ३ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत, तर एक जागा अद्याप रिक्त आहे.
याच जागेसाठी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस रंगली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे अनेक सामने पावसाने वाया गेले आहेत. अशा परिस्थितीत आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पाऊस पडला तर समीकरणात काय बदल होणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यातही पावसाने अडथळला आणला. त्यामुळे सेमी फायनलचा चौथा संघ अद्याप ठरला नाही.
जर आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पाऊस खलनायक ठरला तर अफगाणिस्तानसाठी ही वाईट गोष्ट असेल, कारण पावसामुळे सामना वाय गेल्यास दक्षिण आफ्रिकेला १ गुण मिळेल आणि त्यांचे ४ गुण होतील. अशा स्थितीत ते ब गटात अव्वल स्थानावर पोहोचतील. यासह अफगाणिस्तान संघ बाहेर पडेल आणि दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल.
दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट सध्या ब गटात सर्वोत्तम आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात पावसाचा धोका असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला कोणतीही अडचण येणार नाही. तो सहज गटात अव्वल ठरेल आणि ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर असेल.
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे इंग्लंडविरुद्ध २०७ धावांच्या फरकाने हरता कामा नये. तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात खेळायला आला तर त्यांना ११.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करण्यापासून रोखावे लागेल.
शुक्रवारी कराचीतील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर आज दिवसभर ऊन राहील आणि पावसाची शक्यता नाही. सामन्यादरम्यान तापमान २० अंशांच्या आसपास असेल. अशा स्थितीत सामना पूर्ण होणे अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या