आयसीसी महिला टी-20 विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा यापूर्वी बांगलादेशमध्ये खेळवली जाणार होती, परंतु आयसीसीने आता मोठी घोषणा करत स्पर्धेच्या ठिकाणी मोठा बदल केला आहे.
आयसीसीने नुकतेच जाहीर केले आहे की आगामी आयसीसी महिला T20 विश्वचषक २०२४ आता बांगलादेश ऐवजी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे.
बांगलादेशमध्ये स्पर्धेचे यजमानपद शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, बांगलादेश क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे यजमानपद राखून ठेवेल आणि ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाईल.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश या स्पर्धेचे आयोजन करू शकत नाही ही निराशाजनक बाब आहे, कारण बीसीबीने या स्पर्धेसाठी आवश्यक सर्व तयारी केली होती. परंतु, अनेक सहभागी संघांच्या सरकारांनी बांगलादेशला जाण्याबाबत चिंता व्यक्त केली होती, त्यामुळे हे शक्य झाले नाही.
तथापि, BCB ने आपले यजमान हक्क राखून ठेवले आहेत आणि ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान UAE मधील दुबई आणि शारजाह येथे होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि भविष्यात या दोन देशांमध्ये आयसीसी स्पर्धांचे आयोजन करण्याची आशा व्यक्त केली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला T20 विश्वचषक आयोजित करण्याची ऑफर आधीच नाकारली. ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान चालेल आणि जय शाह यांनी सांगितले होते की त्यावेळी भारतात मान्सूनचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे येथे विश्वचषक आयोजित करणे योग्य निर्णय ठरणार नाही.
भारताशिवाय श्रीलंका आणि झिम्बाब्वेनेही विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदासाठी स्वारस्य दाखवले होते. परंतु हवामान आणि इतर अनेक कारणांमुळे युएई हे महिला टी-20 विश्वचषक २०२४ चे नवीन यजमान म्हणून निश्चित करण्यात आले आहे.