मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मेलबर्नमधून पीच आणणार, प्रेक्षकांसाठीही तात्पुरती सोय, अमेरिका भाड्याच्या वस्तूंवर वर्ल्डकप खेळवणार

मेलबर्नमधून पीच आणणार, प्रेक्षकांसाठीही तात्पुरती सोय, अमेरिका भाड्याच्या वस्तूंवर वर्ल्डकप खेळवणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2024 08:39 PM IST

T20 World Cup 2024 : अमेरिकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्व उपकरणं ही तात्पुरत्या स्वरुपाची असतील. क्रिकेट पीचदेखील तात्पुरती असणार आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठीची गॅलरीसह सर्व गोष्टी तात्पुरत्या काळासाठी तयार करण्यात येणार आहेत. वर्ल्डकपनंतर हे सगळं काढून टाकण्यात येणार आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024

आगामी टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली आहे. सर्व संघ सध्या जास्तीत जास्त टी-20 सामने खेळण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल स्पर्धेद्वारे विश्वचषकाची तयारी करतील. टी-20 विश्वचषकापूर्वीच आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. 

टी-20 विश्वचषक २०२४ या स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये केले जाणार आहे. या वर्षी जून महिन्यात हा टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. पण या विश्वचषकाबाबत आयसीसीने एक मोठा खुलासा केला आहे. 

वास्तविक, अमेरिका या टी-20 वर्ल्डकपसाठी तात्पुरती तयारी करणार आहे. म्हणजेच, वर्ल्डकप सामन्यासाठी लागणारी पीच मेलबर्न आणि अ‍ॅडलेड येथून आणली जाणार आहे. तसेच, जास्तीत जास्त प्रेक्षकांना सामने पाहता यावेत यासाठी तात्पुरते स्टँड्स बनवले जाणार आहेत.  

ड्रॉप इन पीच म्हणजे काय?

अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरल्या जातील. या पीच अ‍ॅडलेड ओव्हलचे क्युरेटर डॅमियन हॉफ हे तयार करतील.  आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे ड्रॉप इन पीच काय प्रकार आहे?  ड्रॉप इन पीच म्हणजे, अशा पीचेस, ज्या मैदानापासून वेगळ्या दुसरीकडे तयार केल्या जातात. यानंतर सामन्याआधी त्या पीच आणून मैदानात लावल्या जातात. 

सर्व सुविधा तात्पुरत्या असतील

याशिवाय ९ जून रोजी या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. यासाठी ३४,००० प्रेक्षक क्षमतेची तात्पुरती गॅलरी तयार करण्यात येणार आहेत. वर्ल्डकपनंतर ही प्रेक्षक गॅलरी काढून टाकण्यात येईल.

या सर्वांबाबत माहिती देताना आयसीसीचे इव्हेंट डायरेक्टर ख्रिस टेटली म्हणाले, की "आम्ही ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरणार आहोत, ज्या आधीच बनवल्या गेल्या आहेत. आम्ही अ‍ॅडलेड ओव्हलचे क्युरेटर डॅमियन हॉग यांच्या कौशल्याचा वापर करत आहोत. ते या बाबतीत तज्ञ आहेत. सोबतच, प्रॅक्टिस पीचेस वेगळ्या असतील आणि सामन्यासाठी वेगळ्या पीच बनणार आहेत. याशिवाय पाऊस पडल्यास पाण्याचा निचरा होण्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे.

आयसीसी इव्हेंट डायरेक्टर पुढे म्हणाले, की "सर्व पायाभूत सुविधा तात्पुरत्या असतील. क्रीडा स्पर्धांमध्ये असे नेहमीच घडले. काही उपकरणे लास वेगास येथून आणली जातील, ती सामन्याच्या आधी सेट केली जातील आणि नंतर काढून टाकली जातील. अमेरिकेत ३० मिलियन क्रिकेट चाहते आहेत. आणि ही तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या सर्वांचे बांधकाम फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि त्यांचे काम मे पर्यंत पूर्ण होईल."

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi