ICC Test Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ! विराट, रोहितला धक्का, तर यशस्वी टॉप-५ मध्ये-icc test rankings yashasvi jaiswal into top 5 virat kohli and rohit sharma suffered loss ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ICC Test Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ! विराट, रोहितला धक्का, तर यशस्वी टॉप-५ मध्ये

ICC Test Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ! विराट, रोहितला धक्का, तर यशस्वी टॉप-५ मध्ये

Sep 25, 2024 06:06 PM IST

Icc test rankings : आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी मोठी झेप घेतली आहे. तर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे.

यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि विराट कोहली
यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि विराट कोहली (X)

Icc test rankings  : भारत आणि बांगलादेश संघात कसोटी मालिका खेळवली जात असून पहिला कसोटी सामना भारतीय संघाने २८० धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली  (virat kohli )दोन्ही डावात स्वस्तात बाद झाले. या खराब कामगिरीचा त्यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. विराट कोहली टॉप १० मधून बाहेर पडला आहे, तर रोहित शर्माची (rohit sharma) दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी खेळाडूंची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वालने एका स्थानाची झेप घेत टॉप-५ मध्ये प्रवेश केला आहे. तो ७५१ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वीने अर्धशतक (५६) झळकावले होते. सध्या तो सर्वोच्च कसोटी रँकिंग असणारा भारतीय फलंदाज आहे. यष्टीरक्षक रिषभ पंतनेही कामगिरीत सुधारणा करत टॉप-१० मध्ये पुनरागमन केले आहे. त्याने चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात ३९ धावा तर दुसऱ्या डावात शतक (१०९) झळकावले होते.

पंतने डिसेंबर २०२२ नंतर पहिलाच कसोटी सामना खेळला व जबरदस्त कामगिरी केली. ७५१ गुणांसह पंत सहाव्या स्थानावर आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. कोहली पाच स्थानांनी घसरून बाराव्या स्थानावर आला आहे. त्याचे ७०९ गुण आहेत. त्याने पहिल्या कसोटीत एकूण १३ धावा केल्या होत्या.  'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितची बॅटही शांत होती. त्याने एकूण ११ धावा केल्या. रोहितच्या कसोटी क्रमावारीत पाच स्थानांची घसरण झाली असून तो दहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे ७१६ गुण आहेत. या यादीत जो रूट (८९९) अव्वल, तर केन विल्यमसन (८५२) दुसऱ्या स्थानावर आहे. डॅरिल मिशेल (७६०) आणि स्टीव्ह स्मिथ (७५७) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

गोलंदाजीतील अश्विन अव्वल क्रमांकावर -

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू प्रबाथ जयसूर्याने टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. तो ७४३ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. त्याच्या क्रमवारीत पाच स्थानांची सुधारणा झाली आहे. जयसूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या गाले कसोटीत ९ विकेट्स घेतल्या होत्या. जयसूर्या (७४३) हा श्रीलंकेचा तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोच्च क्रमवारी असणारा खेळाडू आहे.  त्याने असिथा फर्नांडो (७००) ला मागे टाकले आहे.  फर्नांडो १३ व्या स्थानावर घसरला आहे. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (८७१) पहिल्या आणि जसप्रीत बुमराह (८५४) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अश्विनला चेन्नईत ६ तर बुमराहला ५ बळी मिळाले होते.

Whats_app_banner