आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा नंबर वन कसोटी गोलंदाज ठरला आहे. त्याचे सध्या ८७० गुण आहेत. एका स्थानावर झेप घेताच त्याने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. तो ८६९ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत या दोघांनी आश्चर्यकारक कामगिरी करत ११-११ विकेट्स घेतल्या होत्या.
कानपूर कसोटीत बुमराहने ६ तर अश्विनने ५ बळी घेतले होते. अश्विनला मालिकावीर घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या कसोटीत ६ विकेट्स घेण्याबरोबरच शतक झळकावले होते.
बांगलादेशचा मेहदी हसन (चार स्थानांच्या प्रगतीसह १८व्या स्थानावर) आणि अनुभवी फिरकीपटू शाकिब अल हसन (पाच स्थानांच्या प्रगतीसह २८व्या स्थानावर) यांनी क्रमवारीत सुधारणा केली आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू प्रबाथ जयसूर्या (८०१) याने कारकिर्दीतील सर्वोच्च मानांकन मिळविले. तो संयुक्तपणे नवव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्याने १८ विकेट्स घेतल्या आणि मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.
फलंदाजांच्या यादीत भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली टॉप-१० मध्ये परतला आहे. कोहलीने सहा स्थानांची झेप घेतली आहे. तो ७२४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४७ तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावांची खेळी केली होती. चेन्नई कसोटीतील खराब कामगिरीमुळे त्याला टॉप-१० मधून वगळण्यात आले होते. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (७९२) दोन स्थानांची झेप घेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
यशस्वी कानपूर कसोटीत सामनावीर ठरला होती. त्याने दोन्ही डावात दोन अर्धशतके झळकावली. यशस्वीने बांगलादेश मालिकेत एकूण १८९ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (८९९) अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन (८२०) पहिल्या क्रमांकावर आहे. कर्णधार रोहित शर्माला (६९३) पाच स्थानांची घसरण झाली आहे. तो १५ व्या क्रमांकावर घसरला आहे. 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितला बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटीत केवळ ४२ धावा करता आल्या.