भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीनंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल याला मोठा फायदा झाला आहे. भारताचे युवा खेळाडू ध्रुव जुरेल आणि सरफराजच्या मानांकनावर अनेक नजरा खिळल्या होत्या.
आयसीसीच्या नवीन क्रमवारीत ध्रुव जुरेलने मोठी झेप घेतली आहे, तर सरफराजने निराशा केली आहे. ध्रुवने आयसीसी कसोटी क्रमवारीत शानदार एन्ट्री केली आहे. ध्रुव जुरेल जगातील टॉप १०० खेळाडूंच्या यादीत आला आहे. एवढेच नाही तर अनेक बड्या खेळाडूंना मागे टाण्यातही तो यशस्वी ठरला आहे.
ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या पहिल्याच डावात त्याने इंग्लंडविरुद्ध ४६ धावांची खेळी खेळली. त्याला आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यश आले नाही,पण आपली छाप सोडण्यात तो यशस्वी ठरला. यानंतर जेव्हा त्याने रांचीमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला, तेव्हा त्याने तिथे पुन्हा आपली प्रतिभा दाखवली.
ध्रुव जुरेलने रांची कसोटीच्या पहिल्या डावात ९० धावांची मौल्यवान खेळी खेळली आणि दुसऱ्या डावात भारतीय संघ संकटात सापडला असताना त्याने नाबाद ३९ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून देऊनच तंबूत परतला.
ध्रुव जुरेलच्या पहिल्या कसोटीनंतर जेव्हा आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली होती, तेव्हा त्याला पहिल्या १०० फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. पण आता तो थेट ६९ व्या क्रमांकावर आला आहे. त्याने ३९ स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग सध्या ४६१ आहे. पुढच्या कसोटीतही त्याने याच पद्धतीने धावा केल्या तर तो लवकरच टॉप ५० खेळाडूंच्या यादीत सामील होऊ शकतो.
केवळ दोन कसोटी खेळल्यानंतर त्याने वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर, काइल मेयर्स, दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसेन यांसारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे.
यापूर्वी याच मालिकेतून भारताकडून पदार्पण करणाऱ्या सरफराज खाननेही आयसीसी कसोटी क्रमवारीत दमदार एंट्री केली होती. पण रांची कसोटीत तो जास्त धावा करू शकला नाही आणि गोल्डन डकचा बळी ठरला, त्यामुळे आता तो टॉप १०० फलंदाजांच्या यादीत दिसत नाही.
संबंधित बातम्या