ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये जगातील नंबर-वन गोलंदाज बनला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली. यामध्ये बुमराहने दोन दिग्गजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून ८ विकेट घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. आपल्या दमदार कामगिरीमुळे बुमराहने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत दोन महान गोलंदाजांना मागे टाकले. बुमराह आता कसोटीतील नंबर वन गोलंदाज बनला आहे.
यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर होता. भारताचा बुमराह तिसऱ्या क्रमांकावर होता. आता बुमराहने या दोन वेगवान गोलंदाजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.
जसप्रीत बुमराहचे आता ताज्या आयसीसी क्रमवारीत ८८३ रेटिंग गुण आहेत. तर कागिसो रबाडाचे आता ८७२ रेटिंग गुण आहेत. रबाडाची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याशिवाय जोश हेझलवूड ८६० रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
याआधीही बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-वन गोलंदाज होता. ३० ऑक्टोबर रोजी बुमराहकडून नंबर वनचे स्थान हिसकावण्यात आले. त्यावेळी कागिसो रबाडा याने बुमराहला मागे टाकत कसोटीत जगातील नंबर वन बनलाहोता. आता २७ दिवसांनंतर बुमराहने रबाडाला मागे टाकत पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे.
ताज्या आयसीसी क्रमवारीत, दोन अन्य भारतीय गोलंदाजांचाही टॉप-१० मध्ये समावेश आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यासह गोलंदाज रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे.