आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (२० नोव्हेंबर) टी-२० खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याला फायदा झाला आहे. हार्दिक पुन्हा एकदा नंबर-१ टी-20 अष्टपैलू बनला आहे.
इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोन आणि नेपाळच्या दीपेंद्रसिंग ऐरी यांच्याकडून हार्दिकने नंबर वनचा ताज हिसकावून घेतले आहे. हार्दिकचे सध्या २४४ रेटिंग गुण आहेत. लिव्हिंगस्टोन २३० गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर ऐरी (२३०) दुसऱ्या स्थानावर आहे.
हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ३९ धावांची खेळी केली. या मालिकेत त्याने दोन विकेट्सही घेतल्या होत्या. भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली.
हार्दिकने दुसऱ्यांदा टी-20 अष्टपैलूंच्या रँकिंगमध्ये नंबर-वनचे स्थान मिळवले आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अखेरीस त्याने प्रथम अव्वल स्थान पटकावले.
आयसीसीच्या ताज्या रँकिंग अपडेटमध्ये मोठी झेप घेणारा हार्दिक हा एकमेव भारतीय खेळाडू नाही. फलंदाजीच्या यादीत युवा क्रिकेटपटू तिलक वर्मा यालाही मोठा फायदा झाला आहे. त्याने ६० स्थानांची झेप घेत टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याला मागे टाकत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
तिलकच्या खात्यात ८०६ रेटिंग पॉईंट्स आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० सामन्यात त्याने नाबाद शतक झळकावले होते. तिलकने मालिकेत २८० धावा करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.
सूर्याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो ७८८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन यानेही मोठा फायदा मिळवला आहे. संजूने १७ स्थानांची झेप घेत २२ वे स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या आणि चौथ्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ट्रिस्टन स्टब्स (तीन स्थानांच्या प्रगतीसह २३ व्या स्थानावर) आणि हेनरिक क्लासेन (सहा स्थानांच्या प्रगतीसह ५९व्या स्थानावर) यांनीही क्रमवारीत सुधारणा केली आहे. श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस (तीन स्थानांच्या प्रगतीसह बाराव्या), वेस्ट इंडिजचा शाई होप (१६ स्थानांच्या प्रगतीसह २१व्या), ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोइनिस (१० स्थानांच्या प्रगतीसह ४५व्या स्थानावर) यांनाही फायदा झाला आहे.