ICC T20 Cricket Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अर्थात आयसीसीनं बुधवारी टी-२० खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. आक्रमक फलंदाजीमुळं अलीकडंच प्रकाशझोतात आलेला अभिषेक शर्मा यानं या क्रमवारीत बाजी मारली आहे. तो ४० व्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. तर गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्ती यानंही दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजला मारली आहे.
अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती हे दोन्ही तरुण सध्या कमालीच्या फॉर्मात आहेत. अभिषेकच्या खात्यात सध्या ८२९ रेटिंग पॉईंट्स आहेत. भारत-इंग्लंड मालिकेत त्यानं आश्चर्यकारक कामगिरी केली होती. त्यानं पाच सामन्यांत ५५.८० च्या सरासरीनं २७९ धावा केल्या आहेत. पाचव्या टी-२० सामन्यात त्यानं ५४ चेंडूत ७ चौकार आणि १३ षटकारांसह १३५ धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड हाच केवळ आता अभिषेकच्या पुढं आहे. हेड ८५५ गुणांसह अव्वल स्थानी आहे. टॉप-१० मध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. टिळक वर्मा (८०३) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (७३८) अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर घसरले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक स्थान गमवावं लागलं आहे.
टिळक वर्माला एक सामना वगळता कोणतीही मोठी खेळी खेळता आली नाही. सूर्या संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरला होता. इंग्लंडचा फिल सॉल्ट (७९८) चौथ्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या शेवटच्या टी-२० मध्ये त्यानं अर्धशतक झळकावलं होतं. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (७२९) सहाव्या आणि पाकिस्तानचा बाबर आझम (७१२) सातव्या स्थानावर आहे.
टी-२० गोलंदाजांच्या रँकिंगचा विचार केला तर भारताचा 'मिस्टी स्पिनर' वरुण चक्रवर्ती यानं पहिल्या क्रमांकाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. त्यानं तीन स्थानांची झेप घेत संयुक्तपणे दुसरं स्थान पटकावलं आहे. त्यांचे ७०५ रेटिंग गुण आहेत. चक्रवर्तीनं इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत किलर बॉलिंग करत १४ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. या मालिकेत तो सर्वाधिक बाद करणारा फलंदाज होता. त्याला प्ले ऑफ द सीरिज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदच्या खात्यातही ७०५ गुण आहेत. त्याचं नंबर एकचं सिंहासन गेलं आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत त्यानं एकूण ५ विकेट्स घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकील हुसेन (७०७) या यादीत अव्वल स्थानी आहे. फिरकीपटू रवी बिश्नोई (६७१) सहाव्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (६५२) नवव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या