आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (१३ नोव्हेंबर) वनडे आणि टी-20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पुन्हा एकदा नंबर-१ वनडे गोलंदाज बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याच्याकडून नंबर वनचा खिताब हिसकावून घेतला.
आफ्रिदीने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर केशव तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. शाहीनने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने तीन सामन्यांत १२.६२ च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या. याआधी त्याने वनडे विश्वचषक २०२३ मध्ये नंबर-१ मानांकन मिळवले होते.
तर शाहीनचा सहकारी हारिस रौफ १४ स्थानांच्या प्रगतीसह १३व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० विकेट्स घेतल्या आणि मालिकावीर म्हणून त्याची निवड झाली. वेगवान गोलंदाज नसीम शाहनेही कारकिर्दीतील नवे सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे. तो १४ स्थानांची झेप घेत ५५ व्या स्थानावर पोहोचला आहे.
यानंतर वनडे फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल स्थानावर कायम आहे. माजी कर्णधार बाबरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तो तीन सामन्यांत एकदा बाद झाला होता, याचा त्याला फायदा झाला.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकून इतिहास रचला. पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकली.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने टी-20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. फलंदाजांच्या यादीत सॅमसनने २७ स्थानांची झेप घेत ३९ वे स्थान पटकावले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ टी-20 सामन्यांची मालिका सुरू असून सध्या दोन्ही संघ १-१ अशी बरोबरीत आहेत.
सॅमसनने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते, पण दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेचा रीझा हेंड्रिक्स (दोन स्थानांच्या प्रगतीसह १२ व्या स्थानावर) आणि ट्रिस्टन स्टब्स (१२ स्थानांच्या प्रगतीसह २६ व्या स्थानावर) यांनाही फायदा झाला आहे. हेंड्रिक्सने दुसऱ्या टी-२० मध्ये २४ तर स्टब्सने नाबाद ४७ धावा केल्या होत्या.
टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीतही बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा ने ४ स्थानांची झेप घेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा आदिल रशीद अव्वल स्थानावर कायम आहे. वेस्ट इंडिजचा अकील हुसेन (तिसरा) आणि भारताचा रवी बिश्नोई (सातवा) यांनी टॉप-१० मध्ये एन्ट्री घेतली आहे.
न्यूझीलंडचा मिचेल सँटनर (४ स्थानांच्या प्रगतीसह १३व्या), लॉकी फर्ग्युसन (१० स्थानांच्या प्रगतीसह १५व्या), इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (१० स्थानांच्या प्रगतीसह २१व्या स्थानावर) आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना (२२ स्थानांच्या प्रगतीसह ३१व्या स्थानाेवर) यांनीही ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.