चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. अशा स्थितीत आयसीसीने या स्पर्धेची ट्रॉफी पाकिस्तानला पाठवली आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही ट्रॉफी देशभर फिरवायची होती. तसेच, पीसीबी या स्पर्धेची ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्येही (POK) घेऊन जाण्याचा विचार करत होती. पण आयसीसीने पाकिस्तानचे सर्व मनसुबे उधळले आहेत. आता पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन Pok मध्ये जाऊ शकणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार की नाही यावर अजूनही वाद सुरूच आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानने ट्रॉफी देशभर फिरवण्याची घोषणा केली होती. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर कारवाई केली आहे आणि ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमधील तीन शहरांमध्ये म्हणजेच पीओकेमध्ये नेण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान देशभरात ही ट्रॉफी फिरवायची होती. चॅम्पियन्स ट्रॉफी जगातील सर्वात उंच पर्वत शिखर K2 वर नेण्याचीही योजना आहे. यासोबतच ते पाकव्याप्त काश्मीरमधील स्कर्दू, मुरी आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमध्ये नेण्याची योजना होती.
पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर आक्षेप घेतला होता. आयसीसीने याची दखल घेतली आहे. आयसीसीने पीसीबीला ट्रॉफी पीओकेमध्ये न नेण्यास सांगितले आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरमध्ये या ट्रॉफीचे अनावरण होणार होते. परंतु भारताने आयसीसीला आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नसल्याचे सांगितल्यानंतर आणि शहरातील धुक्याच्या परिस्थितीमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला.
चॅम्पियन्स ट्रॉफीवर आतापर्यंत बराच गदारोळ झाला आहे. टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत पीसीबीमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. मात्र वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, याआधीच चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात पोहोचली आहे.