Stop Clock Rule For Bowlers : आयसीसीने नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. खेळाचा वेगा वाढावा, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. आयसीसीने आता गोलंदाजांसाठीही टाईम आऊट नियम लागू केला आहे. आयसीसीने मंगळवारी (२१ नोव्हेंबर) या निर्णयाची घोषणा केली.
एखाद्या गोलंदाजाने जर एका डावात तिसऱ्यांदा नवीन षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर ५ धावांचा पेनल्टी लावण्यात येईल. म्हणजेच, फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा दिल्या जातील. हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये लागू असेल.
दरम्यान, सध्या तरी हा नियम ट्रायलसाठी लागू करण्यात येणार आला असून त्यानंतर त्याची उपयुक्तता आणि परिणाम लक्षात घेऊन तो कायमस्वरूपी लागू केला जाईल. .
डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या ODI आणि T20 क्रिकेटमध्ये ट्रायल आधारावर स्टॉप क्लॉक लागू करण्यात येणार आहे. षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी या स्टॉप क्लॉकचा वापर केला जाईल.
आयसीसी नियम ४०.१.१ नुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील २ मिनिटांत पुढील फलंदाजाने त्याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. जर तो २ मिनिटात स्ट्राईक घेऊन त्याचा पहिला चेंडू खेळू शकला नाही आणि विरोधी संघाच्या खेळाडूंनी बादचे अपील केले तर फलंदाज बाद होऊ शकतो.
मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियमांनुसार टाइम आउटची वेळ मर्यादा ३ मिनिटे आहे. पण वर्ल्ड कपमध्ये ICC नियमांनुसार ती २ मिनिटे आहे. टाईम आऊट झालेली विकेट कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात जात नाही किंवा त्यासाठी अतिरिक्त चेंडू जोडला जात नाही.
आयसीसीच्या बैठकीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाबाबतही चर्चा झाली. आयसीसीने नुकतेच श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. पण अशाही स्थितीत श्रीलंकन संघाला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची परवानगी मिळाली आहे.
मात्र, श्रीलंकेत होणारा २०२४ चा अंडर-१९ विश्वचषक दक्षिण आफ्रिकेला हलवण्यात आला आहे.