क्रिकेटमध्ये अनेक वेळा खेळाडूंना त्यांच्या वाईट शिस्तीमुळे आयसीसीकडून दंडाला सामोरे जावे लागले आहे. पण आता, सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या एका चुकीसाठी आयसीसीने खेळाडूला दंड ठोठावला आहे.
हा खेळाडू दुसरा कोणी नसून वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू अल्झारी जोसेफ आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू होण्यापूर्वी अल्झारी जोसेफने मोठी चूक केली, ज्यामुळे आयसीसीने त्याला दंड ठोठावला आहे.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना सेंट किट्स आणि नेव्हिस येथे खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी तो स्पाइक वाले शूज घालून खेळपट्टीवर चालत होता.
अंपायरने त्याला यापूर्वी वॉर्निंग दिली होती, पण त्याने अंपायरशीच वाद घातला. याशिवाय त्याने चौथ्या पंचालाही शिवीगाळ केली. आता पंचांच्या तक्रारीवरून त्याला मॅच फीच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल वन भंगामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
जोसेफने अपशब्द वापरण्याबाबत अनुच्छेद २.३ चे उल्लंघन केले. गेल्या दोन वर्षांत जोसेफची ही पहिलीच चूक आहे, ज्यामुळे त्याच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जमा झाला आहे.
जोसेफने आपली चूक मान्य केली असून दंड भरण्याचे मान्य केले आहे. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफ्रीचे सदस्य जेफ क्रो यांनी त्याला ही शिक्षा दिली आहे. त्याच्या या कृतीसाठी अधिकृत सुनावणीची गरज नव्हती.
या संपूर्ण घटनेत मैदानावरील पंच कुमार धर्मसेना आणि लेस्ली रेफर होते. तिसरे पंच आसिफ याकूब आणि चौथे पंच ग्रेगरी ब्रॅथवेट होते. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी आयसीसीने आपला निर्णय दिला आहे. लेव्हल वनच्या उल्लंघनांमध्ये खेळाडूंना अधिकृत इशारे, मॅच फीची कपात अशी शिक्षा दिली जाते.
संबंधित बातम्या