Champions Trophy Ticket Price Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना १९ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून त्यांची प्रत्येकी ४ संघांच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
अंतिम फेरीपर्यंत एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाचे सोडून सर्व सामने पाकिस्तानमध्ये होतील. तर भारतीय क्रिकेट संघ आपले सामने दुबईत खेळणार आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांच्या तिकिटांच्या किमतीबाबत एक डॉक्यूमेंट समोर आले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांच्या सुरुवातीच्या तिकीटाची किंमत १ हजार पाकिस्तानी रुपये ठेवली आहे, जी भारतीय चलनात सुमारे ३१० रुपयांच्या समतुल्य आहे. तर दुबईत होणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत काय असेल याचा उल्लेख त्या डॉक्यूमेंटमध्ये नाही.
मात्र कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांचे सर्वात स्वस्त तिकीट पाकिस्तानी चलनात एक हजार रुपये असणार हे निश्चित. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यासाठी सर्वात स्वस्त तिकिट दोन हजार पाकिस्तानी रुपये (६२० भारतीय रुपये) आहे आणि उपांत्य फेरीसाठी सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत ७७६ भारतीय रुपये आहे.
तिकीटाची ही किंमत भारतीय चाहत्यांसाठी महाग नसली तरी पाकिस्तानी चाहत्यांचा खिसा नक्कीच रिकामा होणार आहे. प्रीमियम क्लासच्या तिकिटांबद्दल बोलायचे झाले तर कराचीमध्ये होणाऱ्या सामन्यांची प्रीमियम तिकिटे ३५०० पाकिस्तानी रुपयात उपलब्ध असतील.
बांगलादेश सामन्याचे प्रीमियम तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्याला लाहोरमध्ये ५००० रुपये आणि रावळपिंडीमध्ये ७००० रुपये मोजावे लागतील.
जर एखाद्या व्यक्तीला पाकिस्तान-बांगलादेश सामन्यासाठी व्हीआयपी तिकीट घ्यायचे असेल तर त्याला कराचीच्या मैदानासाठी ७५०० पाकिस्तानी रुपये आणि लाहोरमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी १२५०० पाकिस्तानी रुपये द्यावे लागतील. तर सर्व सामन्यांसाठी व्हीव्हीआयपी तिकिटांची किंमत १२,००० पाकिस्तानी रुपये असेल.
उपांत्य फेरीच्या व्हीव्हीआयपी तिकिटाची किंमत २५००० रुपयांपर्यंत वाढणार आहे. एकूण १८००० तिकिटे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली जातील, मात्र ही तिकिटे ऑफलाइन उपलब्ध असतील की ऑनलाइन खरेदी करता येऊ शकतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या