Wanindu Hasaranga SL vs AFG : अलीकडेच श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली. मात्र, या मालिकेतील विजयानंतर श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा चांगलाच अडचणीत आला आहे.
आयसीसीने श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान हसरंगाने अंपायरशी गैरवर्तन केले होते आणि यात तो दोषी सिद्ध झाला आहे.
वास्तविक, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २१ फेब्रुवारीला दाम्बुला येथे खेळला गेला. या सामन्यानंतर हसरंगाने नो बॉल न दिल्याने अंपायर लिंडन हॅनिबल यांना अपशब्द वापरले होते.
या प्रकरणानंतर हसरंगाला मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला होता आणि ३ डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले होते. गेल्या २४ महिन्यांत त्याचे डिमेरिट गुण वाढून ५ झाले आहेत. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार त्याचे ५ डिमेरिट गुण दोन सामन्यांच्या बंदीत रूपांतरित झाले आहेत.
हसरंगा आता एक कसोटी किंवा दोन वनडे सामने किंवा दोन टी-२० सामने खेळू शकणार नाही.
दरम्यान, पुढील महिन्यात श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात टी-20 मालिका होणार आहे. म्हणजेच, हसरंगा या मालिकेतील दोन सामने खेळू शकणार नाही. ४ मार्चपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. हसरंगा ४ मार्च आणि ६ मार्चला होणाऱ्या टी-20 सामन्यांचा भाग असणार नाही.
श्रीलंकेने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा ४ धावांनी पराभव केला होता. हा सामना १७ फेब्रुवारीला झाला होता. यानंतर १९ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यातही त्यांनी विजय मिळवला. श्रीलंकेने हा सामना ७२ धावांनी जिंकला. मात्र, शेवटच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानने २१ फेब्रुवारीला खेळलेला सामना ३ धावांनी जिंकला.
संबंधित बातम्या