आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला ५८६ कोटी रुपये दिले आहेत. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार असून त्याबाबत बरीच चर्चा झाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. त्यामुळे भारताचे सामने श्रीलंका किंवा यूएईमध्ये होऊ शकतात. आयसीसीने याचीही बजेटमध्ये तरतूद केली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पीटीआयच्या एका बातमीनुसार, पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने सुमारे ७ कोटी डॉलर्सचे बजेट मंजूर केले आहे. आयसीसीच्या वित्त आणि वाणिज्य समितीने बजेटला मंजुरी दिली. तसेच, अतिरिक्त खर्चासाठी ४५ लाख डॉलर्स प्रदान केले आहेत.
वास्तविक टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. जर भारतीय संघ पाकिस्तानला गेला नाही तर भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत होऊ शकतात. अशा परिस्थितीत खर्च वाढेल. या कारणास्तव आयसीसीने पाकिस्तानसाठी अतिरिक्त बजेटची तरतूद केली आहे. जर टीम इंडिया इतर ठिकाणी खेळली तर त्यासाठी ४५ लाख डॉलर्स देण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम कमी असेल, असा अंदाज आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा जेव्हा क्रिकेट सामना होतो तेव्हा दोन्ही देशांचे चाहते खूप उत्सुक असतात. कारण क्रिकेट दोन्ही देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतीय क्रिकेट संघाने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता. त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानला गेलेला नाही. आता भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये खेळताना दिसतात. दोन्ही देशांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका होत नाही.
संबंधित बातम्या