आयसीसीकडून २०२५-२०२९ साठी महिला क्रिकेट संघांचा फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर, असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आयसीसीकडून २०२५-२०२९ साठी महिला क्रिकेट संघांचा फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर, असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक

आयसीसीकडून २०२५-२०२९ साठी महिला क्रिकेट संघांचा फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर, असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक

HT Marathi Desk HT Marathi
Nov 05, 2024 11:38 AM IST

India Women's National Cricket Team Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने पुढील ५ वर्षांसाठी फ्युचर्स टूर प्रोग्राम म्हणजेच एफटीपी जाहीर केला आहे.

आयसीसीकडून २०२५-२०२९ साठी महिला क्रिकेट संघांचा फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर
आयसीसीकडून २०२५-२०२९ साठी महिला क्रिकेट संघांचा फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर (X)

ICC Announces Womens FTP for 2025-29: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२५ ते २०२९ च्या फ्युचर टूर्स प्रोग्रामनुसार, भारतीय महिला संघ घरगुती मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या दोन मोठ्या संघांव्यतिरिक्त भारत या काळात बांगलादेश आणि झिम्बाब्वेचेही यजमानपद भूषवणार आहे. झिम्बाब्वे नुकताच एफटीपीचा ११ वा सदस्य म्हणून सामील झाला. या चार वर्षांत भारतीय महिला संघ न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. एफटीपीमध्ये प्रत्येक सदस्य देशाला त्यांच्या घरच्या मैदानावर आणि दुसऱ्या संघाच्या घरी चार मालिका खेळायच्या असतात.

भारतीय संघ २०२६ मध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंडसोबत तिरंगी मालिका ही खेळणार आहे. महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक वसीम खान यांनी येथे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘सदस्य देशांनी या एफटीपीमध्ये अधिक कसोटी सामने खेळण्याची मागणी केली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे देश वनडे आणि टी-२० सह अनेक प्रकारच्या मालिका खेळण्यास तयार आहेत.’

ऑस्ट्रेलिया जास्तीत जास्त मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध प्रत्येकी दोन आणि वेस्ट इंडिजविरुद्ध एक मालिका खेळणार आहे. आयसीसीच्या सदस्यांनी परस्पर संमतीने यात तिरंगी मालिकेचाही समावेश केला आहे. एफटीपीमध्ये आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या चौथ्या आवृत्तीचे वेळापत्रकही देण्यात आले आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकासाठी ११ संघांना स्थान देण्यात आले आहे.

ही स्पर्धा आयसीसी महिला चॅम्पियनशिप रँकिंगमध्ये महिला विश्वचषकाचे संघ निश्चित केले जातात. झिम्बाब्वे पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत खेळणार आहे. महिला क्रिकेटमध्ये व्यापक जागतिक प्रतिनिधित्वाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि श्रीलंकेचे यजमानपद भूषवणार असून भारत, न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

मे २०२५ ते एप्रिल २०२९ या कालावधीत चालणाऱ्या या एफटीपीमध्ये ४०० हून अधिक सामने खेळवले जातील. यात एकदिवसीय सामन्यांच्या ४४ मालिकांमधील १३२ सामन्यांचा उल्लेख आहे. या कालावधीत आयसीसीच्या इतर स्पर्धांमध्ये २०२५ मध्ये आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (भारत), २०२६ मध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक (इंग्लंड) आणि २०२८ मध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक यांचा समावेश आहे.

Whats_app_banner