चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आता काही दिवसांवर आली आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. ८ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठी बक्षीस रक्कम ठेवली आहे.
विशेष म्हणजे मागील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत बक्षिसाच्या रकमेत ५३ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी, ग्रुप स्टेजमध्ये सामना जिंकल्यानंतर, संघांना वेगळे पैसे दिले जातील आणि स्पर्धेत शेवटच्या स्थानावर असलेला संघ देखील रिकाम्या हाताने परतणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी ८ वर्षांनंतर खेळली जाणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा २०१७ मध्ये खेळली गेली होती, यावेळी बक्षीस रकमेत मागील आवृत्तीच्या तुलनेत ५३% ने वाढ करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी एकूण बक्षीस रक्कम ६.९ मिलियन डॉलर्स इतकी आहे. यात चॅम्पियन बनणाऱ्या संघाला २.२४ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये दिले जातील. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला १.१२ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १० कोटी रुपये मिळतील.
विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडणारे संघदेखील रिकाम्या हाताने जाणार नाहीत. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर असलेल्या संघांना ३.५ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३ कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, ७ व्या आणि ८ व्या स्थानावर असलेल्या संघांना १ लाख ४० हजार डॉलर्स म्हणजेच १ कोटी २० लाख रुपये दिले जातील.
याशिवाय, ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी ३४ हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३० लाख रुपये देखील मिळतील. दुसरीकडे, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व ८ संघांना १२५००० डॉलर्स म्हणजेच अंदाजे १ कोटी रुपयांची वेगळी रक्कम दिली जाईल.
संबंधित बातम्या