ICC Playing XI Of World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने भंगली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलनंतर आयसीसीने या क्रिकेट वर्ल्डकपमधील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या बेस्ट वर्ल्डकप प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या ६ खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
तर, यातील आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा कर्णधार पॅट कमिन्स या संघात नाही. आयसीसीने रोहित शर्माला या संघाचा कर्णधार बनवले आहे.
या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा रचिन रवींद्रही या संघाचा भाग नाही. याशिवाय आपल्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेट जगाला प्रभावित करणाऱ्या हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनाही आयसीसीने आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
वर्ल्डकपच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताकडून विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे.
संघात समावेश असलेल्या विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक ७६५ धावा केल्या. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक २४ बळी घेतले. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीमागेही चांगली कामगिरी केली.
भारताचे ६, श्रीलंकेचा १ , न्यूझीलंडचा १ , दक्षिण आफ्रिकेचा १ आणि वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या २ खेळाडूंचा आयसीसीच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचा दिलशान मदुशंका, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा यांचा या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. आफ्रिकेच्या डी कॉकने या स्पर्धेत सर्वाधिक ४ शतके ठोकली आहेत.
याशिवाय डॅरिल मिशेलने ९ डावात ५५२ धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या झाम्पाने २३ आणि श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने २१ विकेट घेतल्या.
ICC ची वर्ल्डकप 2023 मधील सर्वोत्कृष्ट इलेव्हन- क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरिल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी.
संबंधित बातम्या