Vinod Kambli health condition: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण विनोद कांबळी अलीकडेच सचिनसोबत त्यांच्या बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात दिसला होता. तेव्हापासून त्याच्या प्रकृतीबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमातील कांबळीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत त्याला नीट बोलता येत नसल्याचे समोर आले. यानंतर टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव याने १९८३ च्या विश्वचषक विजेत्या सहकाऱ्यांसह कांबळीला रिहॅबसाठी मदतीची ऑफर दिली.
ही ऑफर कांबळीने आता स्वीकारली आहे. कांबळीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने कपिल देवची ऑफर स्विकारल्याचे सांगितले. तसेच, मी पुन्हा परत येईन, असा निर्धारही कांबळीने केला.
विनोद कांबळी आता १५व्या रिहॅबमध्ये जाण्यास तयार झाला आहे. यापूर्वी त्याच्या जवळच्या मित्राने सांगितले होते की, कांबळी १४ वेळा रिहॅबसाठी गेला होता. कपिल देव यांनी त्याला मदत करण्यापूर्वी त्याने स्वत: यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अट घातली होती.
दरम्यान, कांबळीच्या तब्येती बाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली असतानाच या क्रिकेटपटूने स्वत: लोकांसमोर येऊन आपली सद्य:स्थिती आणि त्याला भेडसावत असलेल्या आर्थिक अडचणींची सविस्तर माहिती दिली आहे.
सचिनसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलताना कांबळीने आपण आता बरे असल्याचे सांगितले. तसेच, त्याने पत्नीने चांगली काळजी घेतल्याचेही सांगितले.
तो म्हणाला "मी आता बरा आहे. माझी बायको माझी खूप काळजी घेते. ती मला तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली 'तुला फिट व्हावं लागेल'. अजय जडेजाही मला भेटायला आला होता. छान वाटलं,' असं कांबळीने या मुलाखतीत सांगितलं.
कांबळीने पुढे सांगितले की, त्याला युरिन इन्फेक्शनचा गंभीर त्रास आहे, त्यामुळे गेल्या महिन्यात तो बेशुद्ध झाला होता. यानंतर पत्नी आणि दोन्ही मुलांनी खूप काळजी घेतली.
मी आता रिहॅबसाठी जायला तयार आहे. मला तिथे जायचं आहे कारण मला कशाचीही भीती वाटत नाही. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे.' अभि हेल्थ पूर्ण करुंगा आणि वापिस आवुंगा (मी आरोग्याशी संबंधित सर्व समस्या वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण करून परत येईन). मी परत येईन, मी तुला सांगतोय." असेही कांबळी म्हणाला.
विनोद कांबळी पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने १९८८ मध्ये मुंबईत हॅरिस शिल्ड सामन्यात तेंडुलकरसोबत विक्रमी ६६४ धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी दोघेही प्रसिद्धीस आले आणि अखेर नव्वदच्या दशकात भारताकडून खेळले. तेंडुलकर सर्वकालीन महान फलंदाज बनला, तर कांबळी दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने मागे पडला.
दोन कसोटी द्विशतके (झिम्बाब्वे आणि इंग्लंडविरुद्ध) नावावर असलेल्या कांबळीचे सुरुवातीचे यश वाद आणि मैदानाबाहेरील समस्यांनी ग्रासले होते. कांबळीने १७ कसोटी आणि १०४ वनडे सामने खेळले आहेत.
संबंधित बातम्या