टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविच याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. पण आता सर्बियाच्या या स्टार टेनिसपटूने एक धक्कादायक दावा केला आहे. २०२२ च्या ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी त्याच्या जेवणात विष मिसळले होते, असा दावा जोकोविचने केला आहे.
या स्पर्धेत जोकोविचला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होतो. त्याने कोरोनाची लस घेतली नव्हती. त्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आणि त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि नंतर विमानात बसवून परत पाठवण्यात आले. या काळात त्याच्या जेवणात विष मिसळले होते, असा दावा जोकोविचने केला आहे.
वास्तविक, जोकोविच यावर्षीचे पहिले ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये भाग घेण्यासाठी गेला आहे. यापूर्वी त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. ३७ वर्षीय जोकोविचने GQ मासिकाला मुलाखत दिली. तो म्हणाला की, मला मेलबर्नमधील हॉटेलमध्ये विषारी अन्न देण्यात आले. त्यामुळे माझी प्रकृती खालावली होती. जेव्हा मी सर्बियाला परतलो तेव्हा मला कळले की माझ्या शरीरात खूप जड धातू आहेत. माझ्या शरीरात शिसे आणि पाराही जास्त प्रमाणात आढळून आला.
कोविड १९ च्या नियमांमुळे जोकोविच २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याने त्याला ताब्यातही घेण्यात आले होते. यासोबतच त्याला चार दिवस हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
हे एक डिटेन्शन सेंटर होते. यानंतर जोकोविचला परत पाठवण्यात आले. जोकोविचनेही कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवल्याचा दावा करण्यात आला होता.
जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याने २४ पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. जोकोविच बऱ्याच काळापासून जगातील नंबर वन खेळाडू आहे. तो सध्या एटीपी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. जोकोविचने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
संबंधित बातम्या