टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) वेगळे झाले आहेत. एलएसजीने आयपीएल २०२५ साठी पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. राहुलचे नाव रिटेनिंग लिस्टमध्ये नसल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण तो फ्रँचायझीचा कर्णधार होता.
पण केएल राहुल लखनौपासून वेगळा होणार हे जवळपास निश्चित होते, कारण आयपीएल २०२४ मध्ये एलएसजीचे मालक संजीव गोएंका यांनी टीका केली होती. तेव्हापासूनच केएल आणि लखनौपासून विभक्त होईल, अशी चर्चा होती.
सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर गोएंका हे मैदानातच राहुलवर राग काढताना दिसले होते, ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. नंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याच्या बातम्या आल्या, पण आता राहुलला नवी सुरुवात करायची आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना राहुलने LSG पासून विभक्त होण्यावर मौन सोडलं. "मला नव्याने सुरुवात करायची आहे. मला माझे पर्याय पाहायचे होते आणि मला तेथे जाऊन खेळायचे आहे जेथे मला थोडे स्वातंत्र्य आणि थोडे हलके सांघिक वातावरण मिळू शकेल. कधी कधी दूर जाऊन स्वत:साठी काहीतरी चांगलं शोधावं लागतं.
३२ वर्षीय राहुलने तीन मोसमात एलएसजीचे नेतृत्व केले होते, ज्यात दोन वेळा प्लेऑफपर्यंत पोहोचण्यात यश आले होते. गेल्या मोसमात एलएसजी सातव्या स्थानावर होती. राहुलने १४ सामन्यात १३६.१३ च्या स्ट्राईक रेटने ५२० धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १३२ आयपीएल सामन्यांमध्ये ४६८३ धावा जोडल्या आहेत, ज्यात ४ शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
इंडिजचा निकोलस पूरन (२१ कोटी), फिरकीपटू रवी बिश्नोई (११ कोटी), वेगवान गोलंदाज मयांक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी) आणि आयुष बडोनी (४ कोटी) यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
यष्टीरक्षक-फलंदाज पूरन संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पूरन आगामी हंगामात एलएसजीची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. एलएसजीने खेळाडूंना रिटेन करण्यासाठी एकूण ५१ कोटी रुपये खर्च केले. लिलावात लखनौकडे आरटीएम (राईट टू मॅच) कार्ड असेल सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात २४-२५ नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारताला २२ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून राहुल भारतीय टी-२० संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.
२०२२ मध्ये त्याने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 'मी काही काळ टी-२० संघाबाहेर आहे. मला माहित आहे की एक खेळाडू म्हणून मी कुठे उभा आहे, मला माहित आहे की पुनरागमन करण्यासाठी मला काय करावे लागेल. त्यामुळे मी या आयपीएल हंगामाची वाट पाहत आहे जेणेकरून मला पुनरागमन करण्याची आणि माझ्या क्रिकेटचा आनंद घेण्याची संधी मिळेल. टी-२० संघात पुनरागमन करणे हे माझे मुख्य ध्येय आहे. "