टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये शतक झळकावून सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. तथापि, हे देखील खरे आहे की शनिवारपर्यंत (१२ ऑक्टोबर) सर्वजण सॅमसनच्या टॅलेंटचे चाहते होते, परंतु तो आपल्या टॅलेंट आणि स्कीलचा नमुना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवू शकला नव्हता.
पण शनिवारच्या रात्रीनंतर आता संजूच्या केवळ टॅलेंटची नाही तर त्याच्या कामगिरीचीही जोरदार चर्चा होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू न शकल्याने संजू सॅमसन स्वतः नाराज झाला होता. हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध केवळ ४७ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १११ धावांची खेळी केल्यानंतर तो म्हणाला, की “ड्रेसिंग रूममधील ऊर्जा आणि सर्व मुलं माझ्यासाठी खरोखर आनंदी आहेत. मीही खूप आनंदी आहे. मी चांगले केले याचा त्यांना आनंद आहे.”
सॅमसन पुढे म्हणाला, "मी ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहून मला वाटले की मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. तसेच, बऱ्याच अनुभवानंतर आणि अनेक सामने खेळल्यानंतर दबाव आणि अपयशाचा सामना कसा करायचा हे मला माहीत आहे. मी खूपदा अपयशी ठरलो आहे, त्यामुळे त्यानुसार माझे मन कसे व्यवस्थापित करायचे हे मला माहीत आहे.
मी स्वतःला सांगत राहतो की मला फक्त प्रोसेसवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, माझे प्रशिक्षण सुरू ठेवावे लागेल, स्वतःवर विश्वास ठेवावा आणि एक दिवस नक्की येईल."
सॅमसन पुढे म्हणाला, "देशासाठी खेळताना खूप दडपण असते. मला कामगिरी करायची होती आणि मी काय करण्यास सक्षम आहे हे मला दाखवायचे होते. मी स्वतःला आठवण करून देत राहिलो की मला ते करायचे आहे. एका वेळी एका चेंडूवर लक्ष केंद्रित करा, तुमचे शॉट्स खेळत रहा."
"माझे कोच आणि कर्णधार मला नेहमी सांगतात की, तुमच्यात कोणत्या प्रकारची प्रतिभा आहे, त्यामुळे ते नेहमी मला बॅक करत राहतात, असेही संजू सॅमसन म्हणाला.
शेवटच्या मालिकेत मी दोनदा शून्यावर आऊट झालो, यानंतर मला वाटले की आता काय होईल? या विचाराने मी केरळला परतलो, पण या मालिकेत त्यांनी मला साथ दिली आणि मी माझ्या कर्णधार आणि प्रशिक्षकाला सेलिब्रेट करण्यास काहीतरी दिले याचा मला खूप आनंद आहे."