आयपीएल २०२४ च्या ३१व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. मंगळवारी (१६ एप्रिल) ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने तुफानी शतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला.
विशेष म्हणजे या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. सर्वप्रथम कोलकाताकडून सलामीवीर सुनील नारायणने शतकी खेळी केली. नारायनच्या फलंदीजीच्या जोरावर केकेआरने २० षटकात २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थाननेही २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून विजय मिळवला.
राजस्थानकडून जोस बटलरने नाबाद शतक केले. या शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल इतिहासातील संयुक्त-सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग केला.
२२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सचा संघ एकवेळ ६ बाद १२१ धावा करून संकटात सापडला होता. मात्र, बटलरने हिंमत गमावली नाही आणि शेवटपर्यंत फलंदाजी करत कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
राजस्थान रॉयल्सने आपल्याच र्व र्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली. २०२० मध्ये, राजस्थान रॉयल्सने शारजाहमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध २२४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. बटलरने चालू मोसमातील दुसरे शतक झळकावले आहे. क्रॅम्प्समुळे बटलर मैदानावर झगडत होता.
मात्र, तो क्रीजवर ठाम राहिला आणि त्याने ख्रिस गेलला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दुसरा क्रमांक मिळवला. बटलरला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बटलर म्हणाला की, स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे आणि हीच या सामन्याची मुख्य गोष्ट आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा, आज हीच खरी गुरुकिल्ली होती. मी लयीसाठी धडपडत होतो. सुरुवातीला मी निराश होतो पण त्यानंतर मी स्वतःलाच म्हटले की ठीक आहे. फक्त खेळत राहा तुला नक्कीच गती मिळेल. यानंतर मी फक्त शांत राहण्याचा प्रयत्न केला. आयपीएल दरम्यान तुम्हाला अनेक आकर्षक गोष्टी दिसतात.
धोनी आणि कोहली, ज्या पद्धतीने ते शेवटपर्यंत खेळतात आणि मीही तेच करण्याचा प्रयत्न केला. संगकाराने मला हे खूपदा सांगितले आहे. नेहमीच एक वेळ येते जेव्हा गोष्टी बदलतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही लढत नाही आणि तुमची विकेट फेकूव देता. संगकारा म्हणाला की फक्त विकेटवर उभे राहा खेळ आपोआप बदलेल. गेल्या काही वर्षांपासून माझ्या खेळाचा हा एक मोठा भाग आहे".
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये कोणताही बदल झाला नाही. राजस्थान रॉयल्स संघ १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. चेन्नई आणि हैदराबाद अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
संबंधित बातम्या