मिचेल स्टार्क चॅम्पियन्स ट्रॉफीमधून अचानक बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे आधीच स्पर्धेत भाग घेत नाहीत, त्यामुळे स्टार्क बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाजी आक्रमण अतिशय कमकुवत दिसत आहे. स्टार्कने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्वत:ला उपलब्ध न होण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार आणि त्याची पत्नी एलिसा हिली गरोदर असल्याची चर्चेला उधाण आले. मात्र, आता तिने ही अटकळ फेटाळून लावली आहे.
विलो टॉक पॉडकास्टशी बोलताना एलिसा हेलीला तिच्या प्रेग्नंसीबाबत विचारण्यात आले. यावर उत्तर देताना एलिस हेली म्हणाली की, 'माझ्याकडे असे पाहू नका. मला काहीच माहिती नाही. मी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली नाही. मै ठीक हू.' ३४ वर्षांची एलिसा हिली हिची गणना ऑस्ट्रेलियातील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. हिलीने आतापर्यंत ११५ एकदिवसीय, १६२ टी-२० आणि १० कसोटी सामन्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
मिचेल स्टार्कने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे सर्व ५ कसोटी सामने आणि श्रीलंका दौऱ्यावर २ कसोटी सामने खेळले. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-१ असा विजय मिळवला. यानंतर, त्याने १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघातून माघार घेतली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या माघारीचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले की, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे संघात नसणे, खूप निराशाजनक आहे. पण ही दुसऱ्या खेळाडूंसाठी संधी आहे. स्टार्कने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही सन्मान करतो. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व करेल. संघात स्पेन्सर जॉन्सन, नॅथन एलिस, सॅम अॅबॉट सारखे युवा गोलंदाज आहेत. अष्टपैलू मार्कस स्टोइनिसच्या अचानक निवृत्तीनंतर आरोन हार्डीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नश लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठ प्रमुख संघांनी आधीच त्यांचे संघ जाहीर केले होते आणि त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत मंजुरीशिवाय बदल करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.
संबंधित बातम्या